सांगोला : सांगोला पोलिसांनी कटफळ, चिकमहुद, महुद, मांजरी, कमलापूर, वाटंबरे अशा सहा ठिकाणी अवैध दारू विक्रीच्या ठिकाणी धाडी टाकल्या. यात ३० लाख रुपये किमतीचा देशी, विदेशी मद्यसाठा व हातभट्टी जप्त करून सहा जणांवर कारवाई केली.
पो. नि. राजकुमार केंद्रे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई केली. कटफळ येथील दीपक खरातच्या हॉटेलमध्ये ४ हजार १५४ रुपये, महुद येथील अमोल धनवडेच्या बिर्याणी हाऊसमध्ये ११ हजार, पांडुरंग कांबळेच्या हॉटेल मामा-भाचेच्या पाठीमागे ठेवलेली २ हजार १०६ रुपयांची दारू, कमलापूर येथील सीताराम ऐवळेच्या राहत्या घराच्या पाठीमागे १५ लिटर हातभट्टीसह मिळून आला.
गोट्या उर्फ रोहित धनवडे हा वाटंबरे येथील बेघरवस्तीमध्ये २ हजार ३८८ रुपयांची देशी दारू विक्री करताना, चिकमहुद येथील खंडू चव्हाण हा ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीजवळ ५ लिटर हातभट्टी विक्री करत असताना मिळून आला. ही कारवाई पो. कॉ. विठ्ठल विभुते, महिपती कांबळे, पो. ना. शिवाजी जाधव, सागर भोसले यांनी केली आहे.