संताजी शिंदे
सोलापूर : न्यू पाच्छा पेठेतील मातृछाया बिल्डिंग सोलापुरातील मटक्याचे केंद्रबिंदू होते. याचा उलगडा मटका हिशोबनीस परवेजच्या मृत्यूमुळे झाला खरा; पण बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून अचानकपणे त्याने मारलेली जीवघेणी उडी सर्वांसाठी धक्कादायक ठरली. राजकीय वरदहस्त आणि पोलीस कर्मचारी यांच्या बळावर ‘मातृछाया’मध्ये अवैध व्यवसाय सुरू असल्याचीही माहिती या घटनेमुळे समोर आली.
मातृछाया बिल्डिंगला संरक्षक भिंतीच्या वरील बाजूने पत्र्याचे शेड मारण्यात आले आहे. बिल्डिंगमध्ये येणारे जाणारे लोक लक्षात येऊ नये म्हणून हिरव्या रंगाचा पडदा संपूर्ण बिल्डिंंगला मारण्यात आला आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाडी टाकल्यानंतर तेथील लेखापालाने उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला. हा प्रकार लोकांच्या लक्षात आल्यानंतर गर्दी होण्यास सुरुवात झाली. गर्दी होऊ नये म्हणून तत्काळ सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे व पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त लावण्यात आला. या भागात येणाºया प्रत्येक व्यक्तीस मज्जाव केला जात होता. आजूबाजूचे लोक दारामध्ये बसून लांबून हा सर्व प्रकार पाहत होते. एकामागे एक पोलिसांच्या गाड्या या परिसरामध्ये येत होत्या. पोलीस उपायुक्त बापू बांगर, सहा. पोलीस आयुक्त अभय डोंगरे, सहा. पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे, सहा. पोलीस आयुक्त कमलाकर ताकवले यांनी घटनास्थळी भेट दिली. सायं. सव्वाचार वाजल्यापासून रात्री साडेनऊ वाजेपर्यंत अधिकाºयांच्या समक्ष पंचनामा सुरू होता.
परवेज पाहत होता मटक्याचा हिशोब परवेज इनामदार हा नगरसेवक सुनील कामाठी व पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी यांच्या भागीदारीमध्ये चालणाºया मटक्याचा हिशोब पाहत होता. परवेज इनामदार याला पत्नी व तीन मुले आहेत. पहिला मुलगा मुस्तफा (वय १७), हमजा (वय ११) तर अब्दुल्ला (वय ८) अशी तीन मुले आहेत. तो पूर्वीपासून मटका या क्षेत्रात काम करत होता. या अगोदर तो सोलापुरातील एका नामांकित नगरसेवकाजवळ अशाच पद्धतीचे लेखापाल म्हणून काम करीत होता. तेथील काम सोडल्यानंतर तो काही वर्षापासून नगरसेवक सुनील कामाठी याच्याजवळ कामाला लागला होता.
जेलरोडचे पोलीस निरीक्षक सदर बझार हद्दीत!न्यू पाच्छा पेठेतील घटनास्थळाचा परिसर जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. घटना घडल्यानंतर या ठिकाणी संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जे.एन. मोगल यांना न बोलवता त्यांना सदर बझार पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते; मात्र सदर बझार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग साळुंखे यांना घटनास्थळी बोलावून घेण्यात आले होते. या प्रकारामुळे पोलीस कर्मचाºयांमधून उलट-सुलट चर्चा केली जात होती.
परवेजच्या घराजवळही लावला होता बंदोबस्तपरवेज इनामदार यांचा मृत्यू झाल्यानंतर ते राहात असलेल्या साईनाथ नगर भाग १ नई जिंदगी येथील राहत्या घराजवळ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे व अन्य पोलीस कर्मचाºयांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.
पोलीस स्वामीला अटक तर नगरसेवक सुनील कामाठीचा शोध सुरूभाजपचे नगरसेवक सुनील कामाठी व पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी या दोघांच्या भागीदारीमध्ये मटका चालवला जात होता. ही बाब गुन्हे शाखेच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी स्टीफन स्वामी याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर भाजपचे नगरसेवक सुनील कामाठी हा फरार झाला आहे. या व्यवसायामध्ये आणखी किती भागीदार आहेत आणि ते कोण आहेत याचा शोध घेतला जात आहे.