खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून वाफेगाव (ता. माळशिरस) येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खननाविरोधात कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज पोलिसांचे पथक गेले होते. त्यावेळी जेसीबीच्या साहाय्याने नदीपात्रात वाळू उपसा सुरू होता. पोलिसांना पाहताच जेसीबी चालकाने पळ काढला. पोलीस जेसीबी ताब्यात घेऊन निघाले असता दादासाहेब जगन्नाथ गाडे (मुख्याध्यापक), किशोर दादासाहेब गाडे (वकील) व ज्योती दादासाहेग गाडे (पोलीस पाटील, सर्व रा. वाफेगाव, ता. माळशिरस) यांनी कारगाडी (एमएच ४५ एजे २७०३) रस्त्यावर आडवी लावून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. किशोर गाडे याने पोलीस पाटलाचा जेसीबी घेऊन जाता काय? मी वकील आहे. तुमच्यावरच केस करतो, असे म्हणून पोलिसांना धक्काबुक्की केली.
--
हा गोंधळ सुरू झाल्यानंतर कारवाईवर असलेल्या पोलिसांनी अतिरिक्त पोलीस मदत घेण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांना फोन केला. पोलीस निरीक्षक पुजारी हे हवालदार रामचंद्र चौधरी, सुहास क्षीरसागर, विकी घाडगे, पोलीस नाईक नीलेश काशीद, नितीन लोखंडे, मनोज शिंदे, अमितकुमार यादव, बारकुंड यांच्यासह तेथे आले व त्यांनी कारवाई केली.
---
दमदाटी करणाऱ्यासह मुद्देमाल जप्त
पोलिसांनी दमदाटी करणारे दादासाहेब गाडे, किशोर गाडे, पोपट दत्तात्रय इंगळे, माउली शिवाजी शिंदे यांच्यासह कार ताब्यात घेतली. या व्यक्तींनाही ताब्यात घेऊन अकलूज पोलीस ठाण्यात आणले. या कारवाईमध्ये पोलिसांनी वाळू, जेसीबी मशीन, मोटारसायकल व कारगाडी जप्त केली आहे.
फोटो लाइन ::::::::::::::
०८पंड०१ : पोलिसांनी ताब्यात घेतलेली कारगाडी.
०८पंड०२ : पोलिसांनी ताब्यात घेतलेला जेसीबी.
-----