आप्पासाहेब पाटील
सोलापूर - सातत्याने पडणारे दरोडे, चोऱ्या रोखण्याबरोबरच रेल्वे गाड्यांमधील संशयित गुन्हेगारांवर नजर ठेवता यावी यासाठी सोलापूर विभागातून धावणार्या रेल्वे गाड्यात आता रात्रीच्यावेळी धावत्या मेल, एक्सप्रेस, पॅसेजर गाड्यांमध्ये आता बंदुकधारी लोहमार्ग पोलिस अन् आरपीएफचे जवान गस्त घालत आहेत. सोलापूर लोहमार्ग पोलीस व रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांकडून ही संयुक्त मोहिम राबविण्यात येत आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बोरोटी-नागणसूर स्टेशन परिसरात दरोडा पडला होता, त्यानंतर रेल्वे पोलिसांनी भविष्यातील अशा घटना होऊ नये यासाठी विविध उपाययोजना आखण्यास सुरूवात केली आहे. सोलापूर विभागातून रात्रीच्यावेळी पुणे, मुंबई, हैद्राबाद, गुलबर्गा, विजापूर यासह विविध मार्गावर पॅसेजर, मेल, एक्सप्रेस गाड्या धावतात. या गाडयांमधून सोलापूरसह परराज्यातील प्रवासी प्रवास करतात. रात्रीच्या सुमारास विजापूर मार्गावर एक पॅसेजर गाडी, सोलापूर -पुणे-मुंबई मार्गावर सात ते आठगाड्या, सोलापूर-गुलबर्गा मार्गावर आठ ते नऊ गाड्या धावतात. धावत्या रेल्वेगाड्यांबरोबरच मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील प्रत्येक स्टेशनवरही आरपीएफ व लोहमार्ग पोलिसांचे विशेष लक्ष असणार आहे. मागील दोन वर्षापुर्वी बंदुकधारी पोलिस तैनात होते मात्र घटना कमी झाल्यामुळे व कोरोनामुळे ही मोहिम बंद केली होती. आता बाेरोटीजवळ पडलेल्या दरोड्यानंतर ही मोहिम अधिक कडक करण्याचा निर्णय रेल्वे पोलिसांनी घेतला आहे.
या गोष्टींवर ठेवतात पोलिस नजर...
रात्रीच्यावेळी गस्त घालणारे रेल्वे पोलिस रेल्वे गाड्यात संशयित प्रवाशांवर लक्ष ठेवणे, सातत्याने पडणार्या दरोड्यांच्या भागात खिडक्या, दरवाजे बंद करण्याबरोबरच महिला प्रवाशांना दागदागिने सुरक्षित ठेवण्याच्या सुचना देणार, अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई करणार, विनातिकीट प्रवास करणार्या प्रवाशांवर कारवाई करणार, दरवाज्यात बसलेल्या प्रवाशांवर लक्ष ठेवून त्यांना न बसविण्याविषयी सुचना करणार यासह आदी सुरक्षेला प्राधान्य दिले जाणार आहे.
क्रॉसिंग, सिग्नलठिकाणी विशेष काळजी...
एखादी रेल्वेगाडी क्रॉसिंग अथवा सिग्नल थांबल्यावर संबंधित गस्तीवरील पोलिस अन् जवान तातडीने रेल्वे खाली उतरूण गाडी थांबलेल्या परिसरावर नजर ठेवणार आहेत. शिवाय सातत्याने शिट्टी मारणे, बॅटरीचा उजेट परिसरात फिरविणे आदी कार्य केले जाणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दारे, खिडक्या बंद ठेवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येणार आहेत.
प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व्हावा याशिवाय दरोडे, चोर्यांचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी लोहमार्ग व आरपीएफ पोलिसांकडून विशेष संयुक्त मोहिमा राबविण्यात येत आहेत. सध्या रात्रीच्या धावत्या गाडीत बंदुकधारी पोलिसांकडून गस्त घालण्यात येत आहे. रेल्वे पोलिसांबद्दल प्रवाशांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
- कविता नेरकर-पवार,
अप्पर पोलीस अधिक्षक, लोहमार्ग पोलिस विभाग, मध्य रेल्वे