सोलापूर : कोरोना विषाणूचा आजार हा शक्यतो परदेशासह मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरातील आलेल्या व्यक्तींमुळेच उद्भवण्याची शक्यता सर्वात जास्त आहे़ त्यामुळे जिल्हा प्रशासनाने बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याच्या सूचना केल्या आहेत़ त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात परदेशासह परगावहून आलेल्या गावातील लोकांवर पोलीस पाटलांच्या माध्यमातून वॉच ठेवण्यात येणार आहे.
बाहेरून आलेल्या लोकांची नावे तत्काळ तहसील कार्यालय किंवा तालुका अधिकाºयांना कळवून त्यांची संबंधित आरोग्य केंद्रात तपासणी करून घेण्याबाबतच्या सूचना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित पोलीस ठाणे, स्टेशनच्या माध्यमातून पोलीस पाटलांना दिल्या आहेत.
सध्या जगभरात कोरोना या विषाणूच्या आजाराने धुमाकूळ घातला आहे़ राज्यात विविध शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून त्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत़ परदेशातून अथवा परगावाहून आलेल्यांची तपासणी करण्यात येत आहे़ यासाठी आरोग्य यंत्रणा काम करीत आहे़ रेल्वे स्थानकावरही परगावाहून आलेल्या प्रवाशांची तपासणी सुरू करण्यात आली आहे़ राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना त्याचा प्रादुर्भाव सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांना होऊ नये, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील सर्वच शासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.
आरोग्य यंत्रणेमार्फत आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी बाहेरील देशातून आलेल्या नागरिकांची माहिती पुरविण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संबंधित पोलीस स्टेशनच्या माध्यमातून पोलीस पाटलांना केले आहे.
ग्रामपंचायतींना कोरोनाबाबत काळजी घेण्याच्या सूचना- जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी कोरोना प्रतिबंधासाठी आरोग्य विभागाने जारी केलेल्या उपाययोजना अंमलात आणाव्यात अशा सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी दिल्या आहेत़ कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे गावातील आठवडा व जनावरांचा बाजार बंद, मंगल कार्यालये, पानटपरी बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश दिले आहेत. या आदेशाची ग्रामपंचायत हद्दीत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गावातील स्वच्छता व साफसफाई नियमित करण्यात यावी. स्वच्छतेबाबत लोकांनाही जागरुक करण्यात यावे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, महसूल व अंगणवाडी, आशा कर्मचाºयांमार्फत राबविण्यात येणाºया सर्वेक्षणाबाबत सहकार्य करावे. गावात परदेशाहून येणाºया नव्या व्यक्तीबाबत दक्षता घ्यावी व याबाबत प्रशासनाला सूचित करण्यात यावे. ग्रामसेवक व कर्मचाºयांनी आरोग्य विभागाच्या सूचनांबाबत दक्ष रहावे असे कळविण्यात आले आहे.
या दिल्या पोलीस पाटलांना सूचना...
- - गावागावात होणारे गर्दीचे कार्यक्रम रोखा
- - सभा, जत्रा, यात्रा, धार्मिक विधी कार्यक्रम रोखा
- - हरिनाम सप्ताह, सार्वजनिक जयंती, मिरवणुका, बैठका, लग्न समारंभासारखे होणारे कार्यक्रम होणार नाहीत याची काळजी घ्या
- - गावातील पानटपरी, मंगल कार्यालये, परमिट रुम, क्लब बंद करण्याबाबतच्या सूचना द्या
- - गर्दीचे कार्यक्रम केल्यास संबंधितांवर कडक कारवाई
कोरोना या विषाणूचा राज्यात वाढता प्रसार पाहता त्याचा सोलापूर जिल्ह्यात संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध गर्दी होणाºया कार्यक्रमावर बंदी घालण्याबाबत आपत्ती व्यवस्थापन २००५ कायद्याच्या कलमान्वये जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश जारी केले आहेत़ त्यानुसार या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण पोलिसांची यंत्रणा सज्ज आहे़ नागरिकांनी या आजाराला घाबरून जाऊ नये.- मनोज पाटील,पोलीस अधीक्षक