सोलापूर : अकलूज येथील प्रतापगडावर अर्थात बंगल्यात चोरी करण्यासाठी शिरलेल्या चोरट्याला आठजणांनी पकडून मारहाण करीत अकलुज पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर त्या चोरट्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यासह आठजणाविरुद्ध अकलूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अकलुज पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजित उत्तम केंगार (वय २१ रा. वाघोली ता.माळशिरस) हा चोरी करण्याचे उद्देशाने धवलनगर अकलुज येथील डाँ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड बंगाल्याच्या आवारात दि.१८ जानेवारी २०२४ रोजी राञी १:४९ वाजता शिरल्यावर डॉ.धवलसिंह मोहिते पाटील, सतिश पालकर, मयुर माने हिरा खंडागळे व इतर चौघा जणांनी मिळून चोरट्याला मारहाण करुन अकलुज पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांनी चोरट्या विरुद्ध गु.र.नं.५/२४ अन्वये भादं वि १६४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चोरटा जखमी असल्याने त्यास पोलिसांनी अकलूज उपजिल्हा रुग्णालयात उपचारास दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून अकलूज पोलिसांनी काँग्रेस आयचे जिल्हाध्यक्ष डाँ धवलसिंह मोहिते पाटील, गिरझणीचे माजी सरपंच सतिश पालकर,सदस्य मयुर माने,हिरा खंडागळे रा.अकलुज व ४ साथीदारवर भादं वि ३०४,३२४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. यातील सतिश पालकर,मयुर माने यांना अटक करुन माळशिरस न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्यांना २५ जानेवारी २०२४पर्यत पोलिस कोठडी सुनावल्याचे पो.नि.दिपरतन गायकवाड यांनी माहिती देऊन इतर अरोपी गायब असल्याचे सांगितले.अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे - पाटील या करीत आहेत.