मंगळवेढा : वाळूच्या ट्रॅक्टरवर कारवाई टाळण्यासाठी व वरिष्ठाला हप्ता देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळलेला फरार पोलीस नाईक संतोष चव्हाण शरण आल्याने लाचलुचपत विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. मंगळवारी पंढरपूर न्यायालयात उभे केले असता, न्यायाधीश एम.बी.लंबे यांनी १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोराळे येथील एका व्यक्तीचा वाळूचा ट्रॅक्टर पोलीस नाईक संतोष चव्हाण यांनी पकडून पोलीस स्टेशन आवारात आणून लावला होता. ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागितली होती. ट्रॅक्टर मालकाने पुणे येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. १३ मे रोजी फोनवरून पोलीस नाईक चव्हाण व तक्रारदार यांच्यामधील संभाषणाची पडताळणी करून, चव्हाण याच्याविरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.