बार्शी (जि. सोलापूर): बार्शी शहर पोलीस स्टेशनला नव्याने दाखल झालेले पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या निषेधार्थ सोमवार, दि. २० सप्टेंबर रोजी बार्शी बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी घेतला असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लोढा यांनी दिली.
महिन्यापूर्वी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी रामदास शेळके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बार्शीत हजर झाल्यानंतर पहिल्याच दिवशी शहरात फेरफटका मारताना येथील नागरिक व व्यापाऱ्यांना शिस्त नाही, असे सांगत शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा इरादा बोलून दाखविला होता. या संदर्भात त्यांनी मागील दहा दिवसांपासून रस्त्यावर दुकानासमोर उभी असलेली वाहने, दुकानाच्या बाहेर आलेली अतिक्रमणे लक्ष करून शहरात पेट्रोलिंग सुरू केले होते. हे करीत असताना त्यांनी व्यापाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, शिवीगाळ करणे, अपमानित करणे असे प्रकार सुरू केले होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोट
गेल्या आठ-दहा दिवसांपासून बार्शी शहर पोलिसांकडून गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर बसून पोट भरणाऱ्या छोट्या विक्रेत्यांना त्रास देणे, व्यापाऱ्यांना अर्वाच्च भाषेत बोलणे, त्यांना अपमानित करणे असे प्रकार सुरू आहेत़ या निषेधार्थ सोमवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी घेतला आहे.
सुभाष लोढा, अध्यक्ष व्यापारी महासंघ
कोट
व्यापाऱ्यांना शहरातील वाहतुकीच्या कोंडीसंदर्भात बैठक घेऊन त्यामध्ये निर्णय घेऊ असे सांगितले होते. यानंतरही त्यांनी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असेल तर तो त्यांचा निर्णय आहे. अद्याप तरी माझ्याकडे याबाबत काही लेखी निवेदन वगैरे आलेले नाही.
रामदास शेळके, पोलीस निरीक्षक बार्शी शहर