करमाळा शहरातील कुंकू गल्ली येथील सुधाकर रंगनाथ दुगम हे वृद्ध आपल्या मुलाच्या मेन रोडवरील दुकानात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. त्यानंतर घरी जात असताना कुंकू गल्लीच्या बोळात कोणी नाही असे पाहून एक अनोळखी इसमाने दुगम यांना हाक मारून आपण सोलापूरहून गणेशोत्सव बंदोबस्तासाठी आल्याचे सांगितले. तुम्ही बाजारपेठेत गर्दीत सोने घालून फिरता हे योग्य नाही. तेव्हा एका रूमालात सोन्याचे दागिने व पैसै टाका असे सांगितले. दुगम यांना नेमके काय घडते हे लक्षात आले नाही. त्यांनी त्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतःकडील दीड हजार रुपये रोख व एक- एक तोळ्याच्या सोन्याच्या दोन अंगठ्या व दोन तोळे सोन्याची चेन रूमालात ठेवली. काही सेकंदातच रूमाल हातात ठेवून हा भामटा चार तोळे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाला व दुर्गम यांच्या हातात असलेल्या रूमालात फक्त दीड हजार रुपये राहिले. याप्रकरणी करमाळा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या फसवणुकीमुळे करमाळा शहरात भीती निर्माण झाली आहे.
पोलीस असल्याचे सांगून वयोवृद्धाचे चार तोळे पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 4:22 AM