सांगोला : बेकायदेशीररित्या विनापरवाना गावठी दारू तयार करण्याच्या उद्देशाने साखर कारखान्याच्या अधिकाºयांशी संगनमत करून दोघेजण लोखंडी बॅरलमध्ये गुळ मिश्रित रसायन वाहतूक करताना आढळून आले. याप्रकरणी सांगोला २२ हजार ५०० रुपये किंमतीची ७.५ टन गुळ मिश्रित मळी, १९ हजार ५०० रुपयाचे ३८ लोखंडी बॅरेलसह सुमारे ५ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकुण सुमारे ५ लाख ४१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई लोटेवाडी ता. सांगोला येथील हॉटेल पंचरत्न समोर करण्यात आली.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी टेम्पो चालक ज्ञानेश्वर बसवंत जगताप व शंकर ज्ञानेश्वर भिसे दोघेही (रा. गोंधळे वस्ती मार्केट यार्डाच्या पाठीमागे] हैदराबाद रोड ,सोलापूर) यांना अटक केली आहे. पो. नि. राजेश गवळी यांना लोखंडी बॅरेलमधून गुळ मिश्रित रसायन भरून आयशर टेम्पो लोटेवाडीमार्गे सोलापूरच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्याआधारे पोलीस नाईक विठ्ठल विभुते, तुकाराम व्हरे, लतीब मुजावर, हसन मुलाणी यांनी सोमवार ८ जून रोजी रात्री दहाच्या सुमारास लोटेवाडी (ता. सांगोला) येथील हॉटेल पंचरत्न समोरील रोडवर सापळा लावला.
लोटेवाडीकडून एम.एच.२५ यु ०१३१ आयशर टेम्पो येताना दिसल्याने पोलिसांनी चालकास हात करून टेम्पो थांबवून तपासणी केली. यावेळी लोखंडी बॅरेलमध्ये मळी मिश्रित रसायन मिळून आले. पोलिसांनी चालक ज्ञानेश्वर जगताप यांच्याकडे चौकशी केली असता काशिनाथ राठोड यांच्या सांगण्यावरून पडळ साखर कारखानाच्या देशमुख यांच्याशी संगनमत करून मळी मानवी शरीरास घातक असल्याची जाणीव असून सुद्धा ती बेकायदेशीररित्या ३८ लोखंडी बॅरेलमध्ये भरून दारू तयार करण्यासाठी नेत असल्याचे सांगितले. याबाबत पोलीस नाईक तुकाराम व्हरे यांनी फिर्याद दाखल केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले करीत आहेत.