पोलीस सूत्रांनुसार सोलापूर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी सागर बारवकर यांना सोलापूर गुन्हे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे यांनी आष्टी येथील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये राहणाऱ्या सिद्धेश्वर मच्छिंद्र माने याच्या घरालगत असलेल्या पत्र्याच्या गोडावूनमध्ये संशयास्पदरीत्या कीटकनाशक व औषधांचा साठा असल्याची माहिती दिली.
त्यानुसार जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी बारवकर व स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मांजरे यांच्या पथकाने कर्मचाऱ्यांसह २६ जुलै रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या दरम्यान मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे अण्णाभाऊ साठे नगरमधील रोडलगत असलेल्या पत्राशेडच्या गोडावूनमध्ये झडती घेतली. त्यामध्ये विविध कंपनीचे संशयास्पद कीटकनाशके मिळून आली. त्यावेळी जिल्हा गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या पथकाने कीटकनाशक व औषधांचा साठा नोंदणी प्रमाणपत्र उत्पादन प्रमाणपत्राची सिद्धेश्वर माने यांच्याकडे मागणी केली. त्यांनी ते नसल्याचे सांगितले. याबद्दल पथकाने मंगळवारी दिवसभर शहानिशा केली. रात्री तीन कंपन्यांसह कीटकनाशकाचा साठा बाळगणाऱ्या आष्टीच्या सिद्धेश्वर माने अशा चौघांविरुद्ध प्रभारी कृषी अधिकारी गजानन मारडकर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धनाजी खापरे करीत आहेत.
---
पत्राशेडमध्ये कीटकनाशक अन् औषधांचा साठा
या पत्राशेडच्या गोडावूनमध्ये विनापरवाना वेगवेगळ्या कीटकनाशकांचा व औषधाचा साठा मिळून आला. त्याची एकूण किंमत ३ लाख ८३ हजार ८८५ रुपये असून, याप्रकरणी पोलिसांनी एडन क्रोप केअर को राजकोट अहमदाबाद, आनंद ॲग्रो केअर, हवेली (पुणे) व ग्रीन इंडिया ॲग्रो स्ट्रक्चर हवेली (पुणे) या तीन कंपन्यांबरोबरच पत्र्याच्या शेडमध्ये कीटकनाशकांचा साठा बाळगणाऱ्या आष्टीच्या सिद्धेश्वर मच्छिंद्र माने अशा चौघांवर गुन्हा नोंदला.