५ जून रोजी सकाळी ८:३० च्या सुमारास जान्हवी हलदहिवडी-फाळकेवस्ती येथील तिच्या घरासमोर खेळत असताना अचानक गायब झाली होती. ती जन्मापासून डोळ्याने थोडी अंध होती. दरम्यान, कोणीतरी अज्ञात इसमाने उचलून नेऊन तिला पाठीवर, डोळ्याजवळ मारहाण केली. वस्तीपासून १ कि.मी. अंतरावरील चांगदेव चव्हाण यांच्या शेतात साचलेल्या पाण्यात तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत जान्हवीचे वडील अमोल बापूराव फाळके यांनी ६ जून रोजी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
सदर गुन्ह्यातील मुलीचा खून नेमका कोणी, कसा व का केला. याबाबत सांगोला पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सोलापूर ग्रामीण संयुक्तरीत्या तपास करीत होते. अखेर ९ दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी संशयावरून जान्हवीच्या खूनप्रकरणी तिचे आजोबा व चुलती या दोघांना १४ जून रोजी अटक केली. पोलिसांच्या चौकशीत त्यांच्याकडून खुनाचा उलगडा होणार आहे.