पंढरपूर : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात़ पंढरपूर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तीर्थक्षेत्र पोलीस संकल्पना विचाराधीन असल्याचे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी सांगितले़
जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पदभार घेतल्यानंतर मनोज पाटील हे प्रथमच पंढरपूरला सकल मराठा आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी आले होते़ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री अशी चार वेळा मोठी यात्रा भरते़ शिवाय रोज हजारोंच्या संख्येने भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी येतात़ पंढरपुरात येणारे भाविक हे रेल्वे, एस़ टी़ बसने किंवा खासगी वाहनाने येतात़ याठिकाणी दर्शनासाठी येणाºया भाविकांची गर्दी मोठी असते़
या गर्दीचा फायदा घेऊन चोर महिलांचे मंगळसूत्र यासह अन्य दागिने आणि मोबाईल चोरून पोबारा होतात़ या घटना नित्याच्याच आहेत़ त्यामुळेच पंढरपुरात तीर्थक्षेत्र पोलीस संकल्पना विचाराधीन आहे़ तसेच मंदिर व परिसराची सुरक्षितता लक्षात घेऊन मंदिर परिसरात पोलीस चौकी सुरू करण्याचेही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले़
पुण्यासारख्या मोठ्या शहरात वाहतूक शाखेत काम केल्याने पंढरपुरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील़ शिवाय वीरेश प्रभू यांनी निर्माण केलेले खास पथक तसेच पुढे चालू ठेवणार आहे़ दारू, मटका आणि वाळू या अवैध व्यवसायावर करडी नजर ठेवून संबंधितांवर गंभीर स्वरुपाची कारवाई करणार असल्याचे मनोज पाटील यांनी सांगितले़
बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा सज्ज- मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे़ मात्र कोठेही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे़ शिवाय समाजबांधवांनी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये़ शिवाय आपल्यामुळे दुसºयालाही त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे, असे मनोज पाटील यांनी सांगितले़