पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगळवेढा : वाळूचोरीच्या गुन्ह्यात ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस कोठडी मिळालेले पोलीस नाईक संतोष चव्हाण यांना जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शासकीय सेवेतून निलंबित केले आहे.
निलंबित पोलीस नाईक हे बोराळे बीटमध्ये कार्यरत असताना येथील एका व्यक्तीचा ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन आवारात आणून लावला होता. या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी व वरिष्ठांना हप्ता देण्यासाठी वाहनचालकाकडे ३० हजार रुपयांची लाचेची भ्रमणध्वनीद्वारे मागणी केली होती. त्या वाहनचालकाने याबाबत पुणे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर भ्रमणध्वनीवरील संभाषणाची पडताळणी करून पोलीस नाईक चव्हाण विरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल करून लाचलुचपत विभागाने त्यास अटक केली होती. न्यायालयाने काेणत्या अधिका-याला हप्ता द्यायचा, याचा तपास करण्यासाठी आराेपी चव्हाणला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती.
या घटनेनंतर याचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर त्यांना निलंबित केल्याचा आदेश मंगळवेढा पोलीस स्टेशनला प्राप्त झाला आहे.