सोलापूर : चैत्र शुद्ध एकादशी रविवार २ एप्रिल २०२३ रोजी असून, या चैत्री यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येतात. वारीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षितपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी दिली.
चैत्री वारीत पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले असून, सुरक्षेसाठी व वाहतुक नियत्रंणासाठी १ हजार २६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये ३ पोलीस उपअधिक्षक, १२ पोलीस निरिक्षिक, ४४ सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, ३८९ पोलीस कर्मचारी व ४७९ होमगार्ड व एसआरपीएफ कंपनीची तुकडी नियुक्त करण्यात आली आहे. तसेच वारी कालावधीत वाहतुकीची कोंडी होऊ नये भाविकांना वाहुकीचा कोणताही अडथळा येऊ नये यासाठी २ पोलीस निरिक्षक व ९७ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वारी कालावधीत गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सहा ठिकाणी वॉच टॉवर व १३० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्याचबरोबर खाजगी वाहनधारकांच्या वाहनांना थांबण्यासाठी १० ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली असल्याचेही कदम यांनी सांगितले. भाविकांनी तसेच नागरिकांनी सुरक्षेसाठी तसेच वारी सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे असे, आवाहनही उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांनी केले आहे.