आठ हजार घेऊन पाचशेची पावती प्रकरण
अक्कलकोट : कर्नाटकातील पाहुण्याकडून आठ हजार रुपये घेऊन पाचशे रुपयांची पावती दिल्याचे बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध होताच पोलीस अधीक्षक डॉ. तेजस्वी सातपुते यांनी दखल घेऊन संबंधित प्रकरणाची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना दिले आहेत. दरम्यान, तक्रारदाराने पुरेसे पैसे नसताना पोलीस व्हॅनमधून बसवून एटीएममधून पैसे काढून पोलिसांना दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे.
२४ एप्रिल रोजी कर्नाटकात अफझलपूर तालुका येथील माशाळ येथून काही पाहुणे मंडळी अक्कलकोट येथे निधन झालेल्या एका कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते. परत जाताना अक्कलकोट बाह्यवळण रस्त्यावर वाहतूक पोलिसाने त्यांच्याकडून आठ हजार रुपये घेऊन केवळ पाचशे रुपयांचा पावती दिली होती. तीही खाडाखोड झालेली. यासंबंधीचे वृत्त २६ एप्रिल रोजी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. त्याची दखल घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. सातपुते यांनी तत्काळ अक्कलकोट येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांना या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत डॉ. गायकवाड यांनी संबंधित तक्रारदारास कर्नाटकातून बोलावून जाबजबाब घेतले. यामध्ये अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या. यामुळे संबंधित पोलिसांवर काय कारवाई होणार याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
चौकशीत धक्कादायक माहिती उघड
सदर पाहुण्यांकडून आठ हजार रुपये रक्कम नसल्याने स्वतः वाहतूक पोलीस शेख यांनी बाह्यवळण रस्त्यावरून कालिका मंदिर समोरून पोलीस जीपमध्ये बसवून स्टेशन रस्त्यावरील एटीएममध्ये घेऊन जाऊन रक्कम काढून देण्यास भाग पाडले. याबाबत पोलीस जीपवरील चालकाची चौकशी झाली. त्याने एटीएमपर्यंत घेऊन गेल्याचे सत्य असल्याचे सांगितले आहे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसेच तक्रारदाराच्या तक्रारींचे स्वतंत्र अर्ज पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल झालेले आहेत. त्या एटीएम व जवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून घटनेचे फुटेज मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र दुसरा साथीदार वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज मिळू नये यासाठी प्रयत्नशील असल्याची चर्चा सुरू आहे.
-----
सदर घटनेचे चौकशीसाठी पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड यांनी जाबजबाब देण्याकरिता बोलावले होते. त्यावरून त्यांच्या कार्यालयात जाऊन घडलेल्या घटनेची माहिती लेखी स्वरूपात २६ एप्रिल रोजी दिलेली आहे. त्यामध्ये रकमेची केलेली मागणी, दिलेली रक्कम, एटीएमपर्यंत पोलीस गाडीत घेऊन नेल्यासंबंधी सर्व माहिती तपासी अधिकाऱ्यांना दिली आहे.
- सिद्धाराम वामोरे, माशाळ