माघी एकादशीला व द्वादशीला विठ्ठल दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, तसेच पंढरपुरात संचारबंदी आदेश लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे अनेक छोट्या-मोठ्या दिंड्या यात्रेपूर्वीच पंढरीत येऊन जात आहेत. पंढरीत येणाऱ्या अनेक भाविकांकडे मास्क नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंढरपुरातील निर्भया पथकाकडून शुक्रवारपासून यात्रा संपेपर्यंत रोज हजारो मास्क वाटण्यात येणार आहेत, तसेच भाविकांना मास्कचा वापर करावा, यासाठी प्रबोधनही करण्यात येणार आहे.
या मास्क वाटपाचा शुभारंभ उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक अरुण पवार, निर्भया प्रमुख पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांनी केला. भाविकांना मास्क वाटप करण्याचे काम पोलीस कॉन्स्टेबल गणेश इंगोले, अरबाज खाटिक, अविनाश रोडगे, कुसुम क्षीरसागर, चंदा निमगिरे, नीता डोकडे हे कर्मचारी करीत आहेत.
यामुळे मास्क नसलेल्या भाविकांना मास्क मिळतील; परंतु शहरात बंदोबस्तासाठी आलेले पोलीस विनामास्क फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे चौका-चौकात वाहतूक शाखेचे कर्मचारी व अन्य पोलीस मास्क नसलेल्या दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करीत आहेत. यामुळे या विनामास्क फिरणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, असा सवाल भाविकांकडून विचारला जात आहे.
कोट ::::::::::
५०० पोलिसांना मास्क वाटप केले आहेत. दंडात्मक कारवाईचा भाविकांना त्रास होऊ नये. भाविकांना पोलीस प्रशासनाकडून रोज हजारो मास्क वाटप करण्यात येत आहेत. त्याचबरोबर पोलिसांनादेखील मास्कचा वापर करा, अशी सूचना दिलेली आहे.
- विक्रम कदम,
उपविभागीय पोलीस अधिकारी, पंढरपूर
कोट ::::::::::
पंढरपुरात दुचाकीवरून जात असलेल्या नागरिकांचा मास्क थोडा जरी खाली असला तरी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. त्याच पद्धतीने विनामास्क फिरणाऱ्या पाेलिसांवर कारवाई करावी.
- माऊली हळणवार