सोलापूर : सोरेगाव येथील एका दवाखान्याकडे जाणाºया रोडवर पोलिसावर गोळीबार करून जखमी केल्याप्रकरणी तिघांना जिल्हा न्यायाधीश यु.बी. हेजीब यांनी पाच वर्षांची सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
काशिनाथ मल्लप्पा गोळगी, गौडप्पा संगप्पा बिराजदार, शंकरलिंग गोग्यप्पा जेऊर अशी शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. खटल्याची पार्श्वभूमी अशी की, शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांना सोरेगाव परिसरात बेकायदा पिस्तूल विक्री होणार असल्याची माहिती मिळाली होती. माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोरेगाव येथील एका दवाखान्याकडे जाणाºया कच्च्या रोडवर गस्त घातली, तेव्हा आरोपी कोणाचीतरी वाट पाहात होते.
पोलिसांनी आरोपींना गराडा घातला असता, सर्वजण पळून जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग करून काशिनाथ मल्लप्पा गोळगी याला पकडताना झटापट झाली. काशिनाथ गोळगी याने कंबरेला असलेली पिस्तूल बाहेर काढली. पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिर्के यांनी त्याचे दोन्ही हात पकडण्याचा प्रयत्न केला असता काशिनाथ गोळगी याने पिस्तूलमधून एक गोळी झाडली. गोळी पोलीस गणेश शिर्के यांच्या डाव्या पायाच्या मांडीला घासून गेली. गणेश शिर्के हे जखमी झाले होते.
या प्रकरणात सहायक सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी १३ साक्षीदार तपासले. फिर्यादी गणेश शिर्के, पंच व इतर साक्षीदार तसेच डॉ. राहुल राऊत, तपासी अंमलदार शंकर जिरगे व सक्षम अधिकारी तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे सहायक सरकारी वकील अॅड. प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. तर आरोपीतर्फे अॅड. नागेश खिचडे व अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले.
अशी सुनावली शिक्षा...- आरोपी नं.-१ काशिनाथ गोळगी याला भादंवि ३३२ अन्वये दोषी धरून १ वर्ष सक्तमजुरी तसेच ५00 रुपयांचा दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी, आरोपी नं.४ शंकरलिंग जेऊर याला भादंवि ३३२ अन्वये दोषी धरून ६ महिने सक्तमजुरी तसेच प्रत्येकी ५00 रुपये दंड, दंड न भरल्यास ३ महिने सक्तमजुरी, काशिनाथ गोळगी, गौडप्पा बिराजदार, शंकरलिंग जेऊर यांना ३५३ अन्वये दोषी धरून २ वर्षे सक्तमजुरी तसेच प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. काशिनाथ गोळगी व गौडप्पा बिराजदार यांना भारतीय हत्यार कायदा कलम ७ अन्वये दोषी धरण्यात येऊन कलम २५.१ए अन्वये ५ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५00 रुपये दंडाची शिक्षा सुनावली व दंडाची रक्कम न भरल्यास ३ महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.