चपळगाव : वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) येथील ग्रामदैवत चौडेश्वरी देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असून, या यात्रेतील आकर्षण असणाºया ‘बाळबट्टल’ मिरवणूक पाहण्यासाठी रविवारी रात्री महाराष्ट्रासह परराज्यातून हजारो भाविकांनी गर्दी केली होती. हजारोंच्या हातातील पेटविलेल्या दिवट्यांनी संपूर्ण वळसंगनगरी उजळून गेली होती. बाळबट्टलच्या सुरक्षेसाठी मिरवणुकीदरम्यान झालेली गर्दी पांगविण्यासाठी रविवारी दीडच्या सुमारास पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.
यात्रेच्या पहिल्या दिवशी वामनायकाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. दुसºया दिवशी नृसिंहाची सवाद्य मिरवणूक झाली. तर तिसºया दिवशी रविवारी रात्री उशिरा बाळबट्टलाची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी प्रमुख मार्गावरून काढलेल्या रांगोळ्या सर्वांनाच आकर्षित करत होत्या. प्रत्येक घरासमोर बाळबट्टलाची विधिवत पूजा करून ओटी भरली गेली. या मिरवणुकीत सहभागी भाविकांची सोय व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थांकडून महाप्रसाद आणि पाणी वाटप करण्यात आले. यंदाच्या यात्रेत पाणीटंचाईमुळे उपस्थित भाविकांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निदर्शनास आले.
सोमवारी यात्रेच्या चौथ्या दिवशी गावातील प्रमुख मार्गावरून सकाळी हनुमान मंदिरासमोर कुंभ तोडण्याचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते. आनंदमय आणि भक्तिमय वातावरणात येथील यात्रेतील कार्यक्रम पार पडत आहेत. यासाठी पंचकमिटीसह गावातील विविध तरुण मंडळाचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनुचित प्रकार रोखला- वास्तविक वळसंग येथील बाळबट्टल ही कर्नाटकातील माशाळ या गावातून आणल्याचे सर्वश्रुत आहे. वर्षातून एकदाच ही वाटी बाहेर काढल्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी वाट्टेल ते या तत्त्वावर प्रत्येकजण रात्रभर या मिरवणुकीत वावरत असतो. नेमक्या याच कारणाने रविवारी बाळबट्टलच्या मिरवणुकीत पंचक्रोशीतील हौशी लोकांनी वाटी पकडलेल्या मानकºयाभोवती गराडा घालत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथील पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला.
बाळबट्टलचा इतिहास ३५० वर्षांचा- जवळपास ३५० वर्षांखाली कर्नाटकातील माशाळ येथील ईरप्पा नावाचा चौदा वर्षीय मुलगा आपल्या घरी गडबडीत जेवत असताना त्याची आई त्यास ‘तू काय देवीची मानाची वाटी आणण्यास जाणार आहेस का?’ असा सहज प्रश्न विचारला असता ईरप्पाने माशाळच्या यात्रेतील मानाची वाटी ताब्यात घेतली. तेथील नागरिक त्याच्यामागे हत्यारांसह पाठलाग केल्यावर ईरप्पाने वळसंगच्या वेशीत ती मानाची वाटी फेकली आणि दिंडूर पंचक्रोशीत त्याने जिवंत समाधी घेतली. तेव्हापासून वळसंगची चौडेश्वरी यात्रेतील तिसºया दिवशी बाळबट्टल मिरवणूक काढतात.
संस्थांकडून पाणी वाटप- वळसंग गावाला अनेक दिवसांपासून पाणीटंचाईने ग्रासले आहे. याचाच परिणाम म्हणून यावर्षीच्या चौडेश्वरी यात्रेत भाविकांची संख्या घटल्याचे निदर्शनास आले; मात्र भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी स्वखर्चातून येथील बँक आॅफ महाराष्ट्र, विनोद उण्णदकर, ईरण्णा जुजगार, बसवराज कलशेट्टी यांच्यासह मुस्लीम बांधवांनी पाणीटंचाई निवारणासाठी विविध ठिकाणी पाणी वाटले. सिध्दारुढ काळे यांनी स्वखर्चातून तब्बल ४० हजार लिटर पाण्याची व्यवस्था केल्याने ग्रामस्थांना मोठे सहकार्य झाले.