राजकीय विश्लेषण ; करमाळा बाजार समितीने बागल गटाचे मनोधैर्य वाढवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 10:54 AM2018-09-15T10:54:32+5:302018-09-15T10:56:39+5:30
जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याही मताधिक्यात वाढ, पाटील, जगताप यांच्यापुढे आत्मचिंतनाचा विषय
नासिर कबीर
करमाळा : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाला १८ हजार ४४५ मते, पाटील-जगताप युतीला १६ हजार २५१ मते आणि शिंदे गटाला १३ हजार ३०५ मते मिळाली़ बागल गटाचे विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मनोधैर्य वाढले आहे़ तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्याही मताधिक्यात वाढ झाल्याने त्यांचे मनोबल वाढले आहे. परिस्थिती पाहता आ.पाटील व माजी आ.जगताप यांना आत्मचिंतन करावे लागणार आहे.
विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ओळखल्या गेलेल्या करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आ.नारायण पाटील व माजी आ.जयवंतराव जगताप यांची युती झाली होती़ त्यांना मोहिते-पाटील गटाने पाठिंबा दिला होता. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी स्थानिक भाजपाबरोबर काही जागांवर युती करून निवडणूक लढविली होती़ बागल गट स्वबळावर एकाकी निवडणूक मैदानात उतरला होता.
शेतकरी मतदारसंघाच्या १५ जागेसाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत बागल गटाने जातेगाव गटात पोथरे, रावगाव, वीट, सावडी, राजुरी, हिसरे व कंदर या आठ ठिकाणांच्या गणात आघाडी घेतली़ आ.पाटील व माजी आ.जगताप गटाच्या युतीने केम, वांगी, झरे, जिंती, साडे, उमरड या सहा गणात आघाडी घेतली़ संजय शिंदे गटाने वाशिंंबे या एकमेव गणात विजयश्री संपादन केला असला तरी सर्वच गणातून यापूर्वी झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व आदिनाथच्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळवले आहे.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यात झालेल्या विविध निवडणुकीत गटनिहाय झालेल्या कामगिरीचा आढावा घेता फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीत आ.पाटील व माजी आ.जगताप गटाच्या युतीने ४२.८० टक्के मते घेत सत्ता संपादन केली होती़ त्यावेळी बागल गटाला ३६.८१ टक्के व शिंदे गटाला १७.१९ टक्के मते मिळाली होती़ त्यानंतर झालेल्या आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत चारही गट स्वतंत्रपणे लढले़ बागल गटाने एकहाती सत्ता मिळवत ३३.६४ टक्के मते मिळवली. आ.पाटील गट २६.१२ टक्के , जगताप गट १६.३६ टक्के तर शिंदे गटाने २३.१२ टक्के मते मिळवली होती.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत बागल गटाने मुसंडी मारली आहे.
आ.पाटील व जगताप युतीच्या मताधिक्यात घट झाल्याचे दिसून येत आहे़ तसेच शिंदे गटाची प्रगती होत चालली आहे. बागल गट ३८ टक्के , आ.पाटील-जगताप युती ३४ टक्के, शिंदे गटाने २५.४० टक्के मते मिळवली आहेत. पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार असून त्यादृष्टीने आ.पाटील,जगताप, बागल व शिंदे राजकीय वाटचाल करीत आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात माढा तालुक्यातील कुर्डूवाडी शहर व ३३ गावांतील १ लाख १५ हजार मतदारांचा समावेश असून, हा मतदारसंघ निर्णायक ठरणार आहे.