सोमेश क्षीरसागर म्हणाले, माजी आमदार राजन पाटील म्हणतात, उजनी जलाशयातील ५ टीएमसी पाणी नेण्यास आमचा विरोध आहे. कारण हे पाणी नेले तर आमच्या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय होईल. त्यांच्या या वक्तव्याचा अभिमान वाटला.
परंतु त्यांनी सांगितले की, १९९३ मध्ये मंत्रिमंडळातील निर्णयानुसार धरणाची उंची २ मीटर वाढविली तर धरणात १२ टीएमसी पाण्याची वाढ होईल. त्यामुळे ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेता येईल. म्हणजे १२ टीएमसी पाण्याची अतिरिक्त वाढ झाली तर ५ टीएमसी इंदापूरला व राहिलेले ७ टीएमसी पाणी कर्जत जामखेडला जाऊ शकते, असा आरोप करीत उजनीचे धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठीच आहे. त्याचा वापर सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या पिण्याच्या व शेतकरी, कष्टकरी जनतेच्या हक्काचे आहे. त्याचा संपूर्ण वापर हा जिल्ह्यासाठीच व्हावा, ही संपूर्ण जनतेची मागणी आहे. यशवंतराव चव्हाण यांनी धरणाची स्थापनाच सोलापूर जिल्हा हा दुष्काळी आहे. त्या ठिकाणी बारमाही पाण्याच्या पाळ्या मिळाव्यात यासाठीच केली आहे, परंतु सध्या उजनीच्या सर्व वाटपातून नियोजनातून फक्त चार महिने पाण्याच्या पाळ्या सोलापूर जिल्ह्यात मिळत आहेत.
उंची वाढविण्याची मागणी स्वागतार्ह
राजन पाटील यांनी दोन मीटर धरणाची उंची वाढविण्याची जी मागणी केली आहे ती अतिशय स्वागतार्ह आहे. धरणाची भिंत २ मीटरने वाढविली तरी ती सोलापूरकरांच्या हितासाठीच वाढवावी. भविष्यात जर १२ टीएमसी पाणी वाढले तर इंदापूरकर अथवा बारामतीकरांचा किंवा अजून कुणाचा उजनी धरणावर काही एक अधिकार नाही.
याबाबतचे सविस्तर निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देणार असल्याचेही क्षीरसागर यांनी सांगितले.