राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून कै. भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी जाहीर केली आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने गेल्या तिन्ही निवडणुकीत झालेल्या मतविभागणीमुळे भारत भालके यांचा झालेला विजय, याचा अभ्यास करत भाजपकडून इच्छुक असलेले आ. प्रशांत परिचारक यांची समजूत काढण्यात आली. एकास - एक उमेदवार देण्यात भाजपने यश मिळवले आहे. समाधान अवताडे यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.
मंगळवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे समाधान अवताडेंचा अर्ज दाखल करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा. विजयसिंह मोहिते-पाटील, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांच्यासह जिल्ह्यातील आजी-माजी आमदार पदाधिकाऱ्यांची फौज पंढरपुरात दाखल होत आहे. यावेळी भाजपकडून मेळावा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उद्या भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस, स्वाभिमानीसह इतर पक्षांतील प्रमुख दिग्गज नेते पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात येत आहेत.
त्यामुळे अर्ज भरल्यानंतर प्रचाराची दिशाही स्पष्ट होणार आहे.
यावेळी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने उद्या राजकीय धुळवड पाहावयास मिळणार आहे. दिग्गज नेते पंढरपुरामध्ये येत असल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते अन् प्रशासनही कामाला लागले आहे.
---
शरद पवार रुग्णालयात, अजित पवारांची अनुपस्थिती...
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार हे मुबंईमध्ये रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार त्यामुळे पवार कुटुंबातील सर्वच व्यक्तींनी आपले सर्व दौरे, कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यामुळे उद्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पंढरपूर दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे, काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आ. प्रणिती शिंदे यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते येणार आहेत. सकाळी ९.३० वाजता पंढरपुरामधील संत तनपुरे महाराज मठात जमल्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत.
-----