उद्या पंढरपुरात राजकीय धुळवड; समाधान आवताडे, भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 12:43 PM2021-03-29T12:43:12+5:302021-03-29T12:43:18+5:30

सत्ताधारी महाविकास आघाडी अन् विरोधी पक्षातील बडे नेते उपस्थित राहणार

Political dust storm in Pandharpur tomorrow; Samadhan Avtade, Bhagirath Bhalke will file nomination papers | उद्या पंढरपुरात राजकीय धुळवड; समाधान आवताडे, भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

उद्या पंढरपुरात राजकीय धुळवड; समाधान आवताडे, भगीरथ भालके उमेदवारी अर्ज दाखल करणार

Next

पंढरपूर -  बैठका तर्क विर्तकानंतर पोटनिवडणूसाठी अखेर भाजपाने समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वत: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाचे बडे नेते उपस्थित राहणार असल्याचे जाहीर होताच. अवघ्या आठवडाभरात महाविकास आघाडीकडून भगीरथ भालके यांचा अर्ज भरण्यासाठी पुन्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्ता भरणे यांच्यासह शिवसेना, काँग्रेसचे जिल्ह्यातील बडे नेते उपस्थित राहात आहेत. त्यामुळे दोन्हीकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार हे निश्चित असल्याने पंढरपुरात उद्या राजकीय धुळवड पहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आ. भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात १७ एप्रिल रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीकडून कै. भारत भालके यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी निश्चित आहे. मात्र ते भगीरथ भालके की त्यांच्या मातोश्री जयश्री भालके हे उद्या अर्ज भरताना जाहीर होणार आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपने मागील तिन्ही निवडणुकीत झालेली मतविभागणी त्यामुळे कै. आ. भारत भालके यांचा झालेला विजय याचा अभ्यास करत मतविभागणी टाळण्यासाठी भाजपकडून इच्छुक असलेले आ. प्रशांत परिचारक यांची समजूत काढत एकास-एक उमेदवार देण्यात यश मिळवले आहे. समाधान आवताडे यांना उमेदवारी देऊन आघाडीसमोर तगडे आव्हान उभे केले आहे.

उद्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे समाधान आवताडेंचा अर्ज दाखल करण्यासाठी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खा विजयसिंह मोहिते-पाटील, महादेव जानकर, गोपीचंद पढळकर यांच्यासह जिल्ह्यातील आजी माजी आमदार पदाधिकाऱ्यांची फौज पंढरपुरात दाखल होत आहे. यावेळी भाजपकडून मेळावा होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून उद्या भगीरथ भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचा एबी फॉर्म घेऊन पुन्हा स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पालकमंत्री दत्ता भरणे, यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना, कांग्रेस, स्वाभिमानी सह इतर पक्षातील प्रमुख दिग्गज नेते पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पंढरपुरात येत आहेत. त्यामुळे अर्ज भरल्यानंतर प्रचाराची दिशाही स्पष्ट होणार आहे. यावेळी एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता असल्याने उद्या  राजकीय धुळवड पाहवयास मिळणार आहे. उद्या पंढरपुरमध्ये येत असलेले मोठे नेते त्यामुळे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागले असले तरी प्रशासन ही कामाला लागले आहे.

 

Web Title: Political dust storm in Pandharpur tomorrow; Samadhan Avtade, Bhagirath Bhalke will file nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.