आमदार गोपीचंद पडळकर यांनी २१ जुलै रोजी सांगोला तालुक्यातील कोळा, जुनोनी, यलमार-मंगेवाडी, सावेसह सांगोला शहरात ओबीसी समाजाच्या घोंगडी बैठका घेऊन जनजागृती केली.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, ब्रह्मानंद पडळकर, माउली हळणवर, बाबा चव्हाण, विष्णुपंत अर्जुन, आनंदा माने, दादासाहेब लवटे, संतोष देवकते, काशीलिंग गावडे, विष्णू देशमुख, दत्तात्रय जानकर, बाळासाहेब सरगर, तायाप्पा माने, संकेत काळे, कामाजी नायकुडे, राजेंद्र कोळेकर, बिरा शिंगाडे, आनंदराव मेटकरी, अप्पासाहेब कोकरे, बापू जावीर, अनिल पाटील यांच्यासह ओबीसी समाजबांधव उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती मिळाली. अखंड ओबीसी समाजाचे वाटोळे करण्याचे पाप राज्य सरकारने केले आहे. बिरोबाची ताकद काय असते, हे प्रस्थापितांना कळाले आहे. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील प्रस्थापितांचे सरकार आपली मते घेऊन आपल्यावर कसे अन्याय करीत आहे, याची जाणीव आपल्याला असायला हवी, असे आमदार पडळकर म्हणाले.
वारकऱ्यांना दंडुकेशाही दाखवली
पंढरीचा पांडुरंग हा गोरगरीब, उपेक्षित, दीनदुबळ्यांचे दैवत आहे. वारीबाबत मागच्या वर्षी या सरकारचे आम्ही सर्वांनी, वारकऱ्यांनी ऐकले. यावर्षी मुंबईत लेडीज बार सुरू आहेत; पण वारी बंद आहे. हा विरोधाभास सुरू आहे. मोजके वारकरी वारीला जातो म्हटले तरी पोलिसांनी त्यांना दंडुकेशाही दाखवली. या सरकारला चांगली सद्बुद्धी द्यावी. कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी विठ्ठलाने नागरिकांना प्रचंड शक्ती द्यावी, अशी अशी प्रार्थना आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.