मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी मंगळवेढा तालुक्यातील पहिली ठिणगी माचणूर गावात पडली असून, मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय नेत्यांना गावबंदीचा संदेश आता जिल्ह्यातील गावागावातून पुढे येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलनं सुरू आहेत. तालुक्यातील माचणूर गावात मराठा समाजाच्या वतीने राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी असल्याचा ग्रामपंचायत ठराव करण्यात आला आहे ."चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष" मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही, त्यामुळे आपली मान मर्यादा राखुन गावात प्रवेश करावा, आजवर लढलो माती साठी एकदा लढा जातीसाठी या आशयाच्या घोषणा सकल मराठा समाज समस्त माचणूर गावच्या वतीने देण्यात आल्या. माचणूर ग्रामपंचायतचे सरपंच साधना डोके व उपसरपंच नितीन पाटील म्हणाले की आम्हाला पदापेक्षा मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे महत्त्वाचे असून पद गेले तरी चालेल परंतु मागे हटणार नाही.