सोलापूर : लोकसभा निवडणुकीत एकमेकांविरूध्द कडवा प्रचार करणारे विविध पक्षांचे नगरसेवक आज महापालिका सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने एकत्र आले. सभांमधील प्रचाराच्या आठवणी काढून राजकीय गप्पांमध्ये रंगले.
सोलापूर महापालिकेची एप्रिल महिन्यातील सर्वसाधारण सभा आज शनिवारी दुपारी झाली. सभेच्या आधी सभागृहात भाजपचे सभागृहनेते संजय कोळी, बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे, राष्ट्रवादीचे गटनेते किसन जाधव, काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे, भाजपचे नगरसेवक नागेश वल्याळ हे एकत्र आले़ सर्वानीच एकमेकांना हस्तांलोदन केले. चेतन नरोटे यांनी चंदनशिवे यांच्या पिवळ्या पेहरावाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. ‘बरं झालं, निवडणुकीत तुम्ही विरोधात होता़..आता तुमचा आम्हाला पाठिंबा आहे,’ असे नरोटे म्हणताच सर्वजण खळखळून हसले.
यावर चंदनशिवे म्हणाले, ‘सोलापूर लोकसभा निवडणुक खूपच चुरशीची झाली़ मला मतदारसंघात बरेच फिरता आले़ लोकांचे बरेच प्रश्न समजले़ पाण्याबाबतच सर्वजण तक्रार करीत होते़’ त्यावर नरोटे यांनी ‘आम्ही तर पाण्यावरच प्रचार केला,’ असे सांगितले़ तेव्हा सभागृह नेते संजय कोळी व नागेश वल्याळ यांनी स्मितहास्य करून उत्तर देण्याचे टाळले़ दरम्यान, या पाच जणांच्या एकत्र भेटीचा विषय सभागृहात चर्चेचा झाला.