सोलापूर : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील स्व. आमदार भारत भालके यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगीरथ भालके यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. या भेटीत राजकीय विविध मुद्यावर चर्चा झाली. केसीआर पक्षात प्रवेश करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही, कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे भगीरथ भालके यांनी लोकमत शी बोलताना सांगितले. बैठकीतील अधिक तपशील समजू शकला नाही. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबातील सदस्यही होते.
दरम्यान, केसीआर यांनी भगीरथ भालके यांच्यासाठी पुण्याला खास विमान पाठवले होते. बुधवारी सकाळी ते खास विमानाने सहपरिवार पुण्याहून हैदराबादकडे रवाना झाले होते. बुधवारी सायंकाळी उशिरा त्यांची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट झाली. त्यानंतर विविध विषयावर चर्चा झाल्यानंतर एकत्रित भोजनही करण्यात आले. त्यानंतर कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन त्यांची मते जाणून घेऊन पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय घेणार असल्याचे भगीरथ भालके यांनी सांगितले.
स्व. भारत भालकेंच्या निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाने अपेक्षित सहकार्य केले नाही. आर्थिक अडचणीत असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना बाहेर काढण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे वारंवार जाऊनही फारशी दखल घेतली नसल्याची खंत भालके यांनी हैदराबादकडे जाताना बोलून दाखविली होती.