Maharashtra Politics ( Marathi News ) : सोलापूर : महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे कधीही एकत्र येणार नाहीत. दोघे एकत्र आले तरी महायुतीला फटका बसणार नाही. कारण दोघांचेही राजकारण संपलेले आहे, अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली.
राज्यमंत्री आठवले हे सोमवारी सोलापूर दौऱ्यावर होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. यावेळी आरपीआयचे प्रदेश अध्यक्ष राजा सरवदे, के. डी कांबळे, सुशील सरवदे आदी उपस्थित होते.
नाशिकमधला मोठा नेता पक्षाची साथ सोडणार?; शिंदेंनंतर आता भाजपाचा उद्धव ठाकरेंना धक्का
आठवले म्हणाले, येत्या जिल्हा परिषद, मनपा निवडणुकांमध्ये आरपीआयला जागा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. एक एमएलसी तसेच एका मंत्रिपदाची मागणी त्यांच्याकडे केली होती. कार्यकर्त्यांसाठी ही मागणी केली होती. आता महामंडळावर माझे कार्यकर्ते दिसतील. ऑक्टोबरदरम्यान निवडणुका होतील. यात आरपीआयला चांगल्या जागा सुटतील, तशी चर्चा झाली आहे.
याची घ्या काळजी
लव्ह जिहादचा कायदा करताना यात सापडलेल्या मुली धर्मातर करणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कायदा तशाच पद्धतीचा बनवावा, अशी सूचना आठवले यांनी केली आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र मिळवताना विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी जातपडताळणी समितीला अध्यक्षच नाहीत. यामुळे अनेक दाखले रखडले आहेत. यावर काय उपाययोजना करणार आहात, अशी विचारणा पत्रकारांनी यावेळी केली. आठवले यांनी सांगितले. समाजकल्याण विभागाची बैठक घेतो. विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत, हे जाणून घेतो. दाखले लवकर वितरीत करण्याची सूचना संबंधितांना करतो.
इतक्या गाड्यांचे काय करतील
दोन मर्सिडीज गाड्या भेट दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मंत्रिपद मिळायचे, अशी टीका नीलम गोन्हे यांनी केली. यावर बोलताना आठवले म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही गाड्यांची कमतरता आहे का आणि इतक्या गाड्यांचे ते काय करतील. गोन्हे यांच्या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. यावर बोलताना आठवले म्हणाले, टीकेला उत्तर देताना असंसदीय शब्दांचा वापर करू नये. महिलांना अपमानकारक वाटेल, असे बोलू नये.