आप्पासाहेब पाटील
सोलापूर :सोलापूर व माढा लोकसभेसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. सकाळी साडेसात वाजल्यापासूनच अनेक मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा दिसून आल्या. सकाळी ८ वाजेपर्यंत सोलापूर लोकसभेसाठी बारा टक्के तर माढा लोकसभेसाठी दहा टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघात सकाळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, उज्वलाताई शिंदे, माजी आमदार नरसय्या आडम मास्तर त्यांच्यासह माढा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान, मतदानाच्या सुरुवातीलाच कल्याण नगर झेडपी शाळा खोली क्रमांक एक मधील मतदान यंत्र बंद पडले होते. मात्र प्रशासनाने ते तातडीने दुरुस्त केले. याशिवाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी येथील मतदान केंद्र वरील मशीन बंद झालेले होते ते निवडणूक प्रशासनाने सुरू केलेल्या असून मतदान प्रक्रिया त्या केंद्रावर सुरू झालेली आहे.