सोलापूर : शहरीकरण वाढत असताना झाडांची संख्या कमी होत आहे. यामुळे पर्यावरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांच्या संख्येवर परिणाम होते. सोलापुरात सूर्यफूल व डाळिंबाचे उत्पादन जास्त होत असल्याने या पिकांकडे मधमाशा आकर्षित होतात
मधुमक्षिका दिन हा २० मे रोजी जागतिक स्तरावर साजरा केला जातो. मधमाशांच्या संवर्धनासाठी जगभरात हा दिवस साजरा केला जातो. जगप्रसिध्द संशोधक अन्स्टाईने वर्तवलेल्या भविष्यवाणीवरून मधमाशा जर नाहीशा झाल्या तर त्यानंतर साडेचार वर्षात मानवी जीवन पृथ्वीवरून नष्ट होईल यावरून आपल्याला मधमाशा किती महत्त्वाच्या आहेत हे लक्षात येत असल्याचे कीटकशास्त्र संशोधक प्रा. रश्मी माने यांनी सांगितले.
मधमाश्या फुलांमधील मकरंदाचे मधामध्ये रूपांतरण करतात आणि त्यांना पोळ्याच्या कप्प्यांमध्ये साठवून ठेवतात. जंगलांमधून मध गोळा करण्याचा उद्योग दीर्घकाळापासून अस्तित्वात आहे. मधमाशी पालनाचे पर्यावरणावर सकारात्मक परिणाम होतात.
जिल्ह्यात ५० युवक करताहेत मधुमक्षिका पालन
सोलापूर जिल्ह्यातील जिल्ह्या उदयोग केंद्राच्या माध्यमातून गेली सहा वर्षापासूनमधूबन योजनेच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण देण्यात येते. सांगोला, पंढरपूर, माढा, बार्शी या ठिकाणी सूर्यफूल, डाळिंब पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात या मधूबन योजनेचा फायदा झाल्याचा दिसून येतो. जिल्ह्यात ५० युवक हा व्यवसाय करत आहेत. कोरोनामुळे अडचणी आल्या असल्या तरी येत्या काळात अधिक मधमांशाचे पालन करण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचे मधू क्षेत्रिक प्रभाकर पलवेंचा यांनी सांगितले.
मधमाशा फुलोरा येणाऱ्या अनेक वनस्पतींच्या परागीकरणात महत्वाची भूमिका बजावतात, त्यामुळे सूर्यफूल आणि विविध फळे यांसारख्या ठराविक पिकांच्या उत्पादनात वाढ होते. मध गोळा करण्याच्या पारंपरिक पद्धतीमुळे मधमाशांच्या अनेक जंगली वसाहती नष्ट होतात. त्यामुळे मधमाशांचं पेट्यांमधे संगोपन करुन आणि घरच्या घरीच मध उत्पादन घेऊन हे टाळता येते.
- प्रा. रश्मी माने, किटकशास्त्र संशोधक
मधमाशांच्या पालनामुळे उत्पन्नात वाढ तर होतेच त्याच बरोबर मोठ्या संख्येने रोजगार निर्मिती देखील स्थानिक पातळीवरळ होत आहे. जास्तीत जास्त युवकांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू करावा. मधूबन योजनेचा लाभ घेऊन आपले आयुष्य देखील मधुर बनवू शकतो.
- प्रभाकर पलवेंचा, मधू क्षेत्रिक, खादी ग्रामोद्योग मंडळ
--------