सोलापूर : स्थानिक बाजारपेठेत डाळिंबाला प्रतिकिलो १०० ते १५० रुपये भाव मिळाल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे. डिसेंबरअखेर डाळिंब निर्यातीसाठी कृषी खात्याकडे एकही अर्ज आलेला नाही. द्राक्षांचे घड भरण्याच्या स्थितीत असून, संक्रांतीनंतर लोकांना चव चाखता येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातून गतवर्षी १९ मेट्रिक टन डाळिंबाची निर्यात झाली होती. कोरोना साथीमुळे डाळिंब निर्यातीवर परिणाम झाला. कृषी बाजारपेठ सावरल्यावर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पुन्हा डाळिंबाचा बहार धरला. ४१ हजार ८०८ हेक्टरवर डाळिंबाच्या बागा आहेत. ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने डाळिंबाचा बहार गळून गेला. बागांमध्ये पाणी साठून राहिल्याने फळधारणेला अडचण निर्माण झाली. पाऊस थांबल्यावर अनेक उपाययोजना करून शेतकऱ्यांनी बागा टिकविल्या आहेत. केवळ ३० टक्केच पीक शेतकऱ्यांच्या हाती येणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत सध्या आवक कमी असल्याने डाळिंबाला चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी प्लॉटची नोंदणी केली असली तरी आता फळ पाठविण्यासाठी एकाही शेतकऱ्याने कृषी विभागाकडे अर्ज केला नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने यांनी सांगितले.
द्राक्ष उत्पादन घटणार
अतिवृष्टीचा डाळिंबाबरोबर द्राक्ष पिकाला मोठा फटका बसला आहे. सततच्या पावसाने घडधारणा भरपूर झाली नाही. त्यामुळे निर्यातक्षम प्लॉट तयार झाले नाहीत. जिल्ह्यात १६ हजार २० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. यात द्राक्षाचे २२८ प्लॉट नवीन तर २७१ प्लॉट नूतनीकरण केलेले आहेत. गतवर्षी कोरोनामुळे शेतकऱ्यांनी बेदाणा करण्यावर भर दिला. यंदाही स्थानिक बाजारपेठेत द्राक्षाला चांगला भाव मिळण्याची अपेक्षा आहे. येत्या पंधरवड्यात द्राक्षे बाजारपेठेत दाखल होतील असा शेतकऱ्यांचा अंदाज आहे.
अशी आहे डाळिंब लागवड (क्षेत्र हेक्टरमध्ये)
दक्षिण सोलापूर: २३९
उत्तर सोलापूर: १३१
अक्क़लकोट: ८८
मोहोळ: २२३४
पंढरपूर: १००५०
सांगोला: ४९६८
मंगळवेढा: ५९४५
माळशिरस: १५५००
माढा: १७९९
बार्शी: १६५
करमाळा: ६८९