अकलूज : आजची महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांत आपले कर्तृत्व दाखवित आहे. आध्यात्मिक क्षेत्रातही महिला मागे नाहीत, असे दर्शवत श्रीसंत श्रीपाद महाराज, संत रामदास महाराज पालखी सोहळ्यात पूनम बनसोडे या शिस्तीचा दंडक हाती घेऊन चोपदाराचे कर्तव्य पार पाडत आहेत.
२१ व्या शतकात पुरूषांच्या बरोबरीने महिला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, साहित्यात काम करीत आहेत. चंद्रावर पोहचलेली महिला देशाची राष्ट्रपती, पंतप्रधानपदापर्यंत पोहचलेली आहे.
अध्यात्म क्षेत्रात संतांच्या पालखी सोहळ्यामध्ये वंशपरंपरागत चोपदाराचे कर्तव्य पुरुष पाहतात. परंतु त्या परंपरेला छेद देत आळंदी देवाची जवळीलच कोयाळी (ता. खेड) येथील संत श्रीपाद महाराज, संत रामदास महाराज पालखी सोहळ्यात महिला चोपदार म्हणून पूनम बनसोडे या कार्यरत आहेत.
आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर त्या पालखी सोहळ्यात शिस्तीचा दंडक हाती घेऊन संपूर्ण सोहळ्याला शिस्त लावण्याचे काम पाहतात.
गेल्या ५ वर्षांपासून त्या पायी वारी करीत असताना महिला चोपदार म्हणून पुरुष चोपदारांच्या तोडीस तोड असे यशस्वी कर्तव्य पार पाडत आहेत.