अक्कलकोट : बोरी पाटबंधारे शाखा कार्यालय व सोलापूर पाटबंधारे शाखा कार्यालय हे दोनही कार्यालय मैंदर्गी येथे एकाच ठिकाणी कार्यरत आहेत. मागील अनेक वर्षांपासून अस्तित्वात असले तरी हल्ली मात्र कार्यालय अधिकारी, कर्मचारी गायब दिसतात. यामुळे नागरिकांची कामे वेळेवर होत नसल्याची ओरड सुरू आहे. या दोन कार्यालयांसाठी शासकीय वसाहत, पाण्याची सोय करून दिली आहे. सोलापूर पाटबंधारे कार्यालय अनेक दिवसांपासून केवळ एका हजेरी सहायकावर अवलंबून राहिलेले आहे. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनेक पदे रिक्तच आहेत. नऊ तलावाचे काम केवळ एकाच हजेरी सहायकाकडून करून घेतली जातात. याही ठिकाणी डझनभर जागा रिक्त आहेत. कार्यालय आणि साहित्याची अवस्था वाईट झाली आहे.
बाजूलाच सोलापूर पाटबंधारे कार्यालय आहे. या कार्यालयात कर्मचारी नसल्याने ते नेहमीच बंद राहते. सर्व प्रकारचे कागदपत्रे धूळ खात पडून आहेत. जाळ्या जळमट्या, इमारतीला लागलेली गळती, पडझड, वाढलेले गवत यामुळे कार्यालयाची अवस्था विदाकर ठरली आहे. कार्यालयामार्फत बोरी-हरणा नदीवरील नऊ को. प. बंधाऱ्यांची देखभाल केली जाते. या बंधा-यातून शेतीला पाणी घेण्यासाठी या कार्यालयाकडे अर्ज करावे लागते. त्यांना परवाने देणे, वार्षिक पाणीपट्टी वसूल करणे, अशी विविध कामे करावी लागतात. अधिकारी, कर्मचारी यांची वानवा असल्याने ही सर्वच कामे प्रलंबित राहिली आहेत. नुकतेच बोरी नदीला महापूर येऊन गेला. यामध्ये बऱ्याच बंधाऱ्यांना गळती लागली. भराव वाहवून गेले. गेट लिकेज अशा नुकसानीच्या अनेक घटना घडल्या. कर्मचाऱ्यांअभावी त्याची दुरुस्ती खासगी व्यक्तींकडून करून घ्यावे लागते.
पदे झाली रिक्त
शाखा अधिकारी, दप्तर कारकून, तलाव कारकून, मोजणी कारकून, शिपाई, कालवा निरीक्षक, चौकीदार अशी अनेक पदे रिक्त आहेत. केवळ चार जणांवर काम सुरू आहे. जवळच आणखी एक बोरी पाटबंधारे कार्यालय आहे. कार्यालय उघडले जात नाही. परिणामी पाणी मागणीचे अर्ज भरून घेणे, पाणीपट्टी वसूल करणे, बंधाऱ्यांचे गेट बसविणे ही कामे रखडली आहे.
====
जिल्ह्याचा वरिष्ठ अधिकारी म्हणून माझी नेमणूक आहे. मागील दहा वर्षांत अनेक अधिकारी, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्या प्रमाणात रिक्त जागा भरले गेले नाहीत. कामाचे नियोजन चुकते आहे. कमी मनुष्यबळावर कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असतो.
- प्रकाश बाब
उपमुख्यकार्यकारी अधिकारी, पाटबंधारे विभाग
सोलापूर
फोटो : ०५ अक्कलकोट १ आणि २
मैंदर्गी येथील पाटबंधारेच्या दोन्ही कार्यालयांची झालेली दुरवस्था