सोलापूर : कोणाशी तक्रार नाही, सर्वांशी हसत खेळत वागणारा माझं बाळ माझ्यापासून दूर गेलं. भविष्यात माझा नातू ऋषीला काय सांगू त्याचा पप्पा कुठे गेला, असा प्रश्न आकाश जाधव याची आई केसरबाई जाधव येणाºया प्रत्येकाला करीत होत्या. टिकटॉक फेम असलेल्या आकाशची लोकप्रियता त्याच्या अंत्यसंस्काराप्रसंगी लक्षात आली.
आकाश अनंत जाधव (वय २७, रा. पटवर्धन चाळ, रामवाडी, सोलापूर) याने संगमेश्वर महाविद्यालयात १२ वीपर्यंत शिक्षण पूर्ण केले होते. आकाश याला कार, मोटरसायकल चालवण्याचा छंद होता. तो काँग्रेसच्या महिलाध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून कामाला होता. कामाव्यतिरिक्त तो स्पोर्ट्स मोटरसायकल चालवणे, स्टंट करणे असे प्रकार करीत होता. एका चाकावर मोटरसायकल चालवून तो सर्वांना आश्चर्यचकित करीत असे, मुंबई, पुणे आदी भागातून येणारे रायडर्स त्याला बोलावून घेत असत, त्यांच्यासमोर तो स्टंट करून दाखवत असे. मोटरसायकलचा स्टंट पाहण्यासाठी लोक गर्दी करीत असत.
व्हॉट्सअॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इन्स्टाग्रामवर तो विविध पोझमधील फोटो व डायलॉग शेअर करीत होता. त्याच्या फोटो व डायलॉगला हजारो फॉलोअर्स होते. प्रत्येक आठवड्यात पंधरा दिवसात त्याने नवीन काय केले आहे का? याची उत्सुकता फॉलोअर्सना राहात होती. विविध विषयांवर आधारित टिकटॉक कॉमेडी व्हिडिओ तयार करणे हा देखील त्याचा छंद होता. सोशल मीडियावरील त्याची सक्रियता पाहून त्याला मुंबई येथील प्रसिद्ध टिकटॉक ग्रुपने आमंत्रण दिले होते. मुंबई येथे जाऊन विविध विषयावर टिकटॉक व्हिडिओ करीत तिथेच एखादी नोकरी करण्याच्या तयारीत होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचे लग्न झाले होते, त्याला ऋषी नावाचा मुलगा आहे.
रविवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे उठला, आंघोळ करून त्याने घरात चहा घेतला. घराबाहेर पडला तो दिवसभर आलाच नाही. रात्री नातेवाईकामधील एका मित्राच्या वाढदिवसाला गेला. दरम्यान, त्याने झोपेच्या गोळ्या व नशा होणारे द्रव्य घेतले. आकाशने मित्रांना फोन करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. शेवटच्या क्षणी मुलाचा आवाज ऐकण्यासाठी पत्नी कांचन यांना रात्री ९.३0 वाजता फोन केला. माझ्या मुलाला उठव त्याचा मला शेवटचा आवाज ऐकायचा आहे असे तो म्हणाला. पत्नीने तुम्ही असे का बोलता असा प्रश्न केला तेव्हा त्याने मुलाच्या कानाला मोबाईल लावण्याचा आग्रह केला. झोपेत असलेल्या मुलाच्या कानात आकाशने काय सांगितले माहीत नाही, मात्र त्याने रात्री १0.३0 वाजण्याच्या सुमारास स्टेशनजवळील रेल्वे रूळावर पडून जगाचा निरोप घेतला. सोमवारी त्यांच्या अंत्यविधीला मोदी स्मशानभूमीत शहर व परिसरातील दोन ते अडीच हजार लोक उपस्थित होते.
कुत्रे पाळण्याचा होता छंद...- आकाश याला लहानपणी एका कुत्र्याने चावा घेतला होता; मात्र त्याने पुढे न घाबरता कुत्र्यांशी मैत्री करण्यास सुरूवात केली. गल्लीतील पाळीव किंवा फिरस्ते कोणतेही कुत्रे त्याचा आवाज आला की धावत जात होते. स्वत:च्या घरात त्याने विविध जातीचे कुत्रे पाळले आहेत. हे कुत्रे सध्या मालकाचा आवाज येत नाही म्हणून बैचेन झाली आहेत, दिवस-रात्र भुंकून घरच्यांवर राग दाखवत आहेत. आकाश याला राजू आणि पप्पू हे दोन भाऊ आहेत. वडिलांचा लहान असतानाचा अपघाती मृत्यू झाला होता. आईने कष्टातून मुलांना मोठं केलं आहे.