पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाक्याजवळ मोडनिंब येथील महामार्ग पोलिसांचे पथक ८ जानेवारी रोजी सकाळी वाहनांची तपासणी करीत असताना रोडच्या कडेला असलेल्या हॉटेलमध्ये एक मुलगा पोलिसांना दिसला. बराच वेळ एकटाच असल्याने पोलिसांनी त्याची चौकशी केली. तो उपाशी असल्याचे त्यांना कळले. कर्तव्यावर असलेले पोलीस उपनिरीक्षक अनिल चौगुले, हवालदार अभिजीत मुळे, गणेश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याला जेवण दिले. त्यानंतरही तो काहीएक सांगायला तयार नव्हता. वेडीवाकडी उत्तरे द्यायचा. अखेर त्यास विश्वासात घेऊन विचारले असता नंंदुरबार जिल्ह्यातील धाडवाड तालुक्यातील असल्याचे समजले.
धाडवाड पोलिसांकडून मिळाली माहिती
महामार्ग पोलिसांनी धाडवाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवळी यांना संपर्क साधला. गवळी यांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करून त्या मुलाबद्दल माहिती दिली. त्याचे आईवडील हे ऊसतोड कामगार असून ते सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे ऊसतोड करण्यासाठी गेल्याचे सांगितले. त्यानंतर हवालदार अभिजीत मुळे व गणेश शिंदे यांनी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल आहे का याची माहिती घेतली असता ती नसल्याचे समजले. यानंतर महामार्ग पोलिसांना त्या मुलाचे आई-वडील नगौर्ली ता. माढा येथील सोमनाथ रघुनाथ ढवळे यांच्या ऊसतोड टोळीमध्ये काम करणारे पितांबर वळवी रा. जोडवाडा ता. धारवाड जि. नंदुरबार येथील असल्याचे समजले. त्यांचा मुलगा संदीप पितांबर वळवी हा आई-वडील रागावल्याने निघून गेल्याची माहिती समजली. त्यानंतर पोलिसांनी टोळी मालक सोमनाथ ढवळे यांना बोलावून मुलाला त्यांच्या ताब्यात दिले. त्यांनी त्यास त्याच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केले.
फोटो
०८टेंभुर्णी
ओळी
रागाने निघून गेलेलं पोरगं परत आल्याचे पाहून त्यास जेवणाचे ताट घेऊन आलेली माता. सोबत त्याचे वडील व टोळीवरील ऊसतोड कामगार.