वैराग : बार्शी तालुक्यात धामणगाव येथे तिरंगी लढतीत शिवाजी पाटील, तानाजी पाटील व माधव मसाळ, केशव जगताप यांच्या गटाने ११ पैकी ६ जागा मिळवित ग्रामपंचायत आपल्या ताब्यात राखण्यात यश मिळवले. या गावचे सरपंचपद खुल्या वर्गातील सर्वसाधारण व्यक्तीला जाहीर झाले असून किसन पाटील हे या पदाचे दावेदार ठरले आहेत.
गतवर्षी शिवाजी पाटील व किसन जाधव हे दोन गट एकत्र होते. विरोधी विवेकानंद बोधले व नाना पाटील, जगन्नाथ जाधव, एकत्र लढले होते. तेव्हा पाटील, जाधवांची सत्ता आली होती. मात्र, यावेळी जाधवांनी पाटलांना सोडून बोधलेंशी हातमिळवणी केली. नाना पाटलांना बोधले यांचा अल्प प्रतिसाद मिळतोय हे लक्षात येताच त्यांची साथसंगत सोडत श्रीहरी जगताप, दिनकर गवळी, मनोज कांबळे यांना सोबत घेवून स्वतंत्र घरोबा केला.
पहिल्याच वेळेस दोन सदस्य निवडून आणले. परिणामी याचा फटका बोधले गटाला फटका बसला. त्यांना तीनच जागेवर समाधान मानावे लागले. दरम्यान, शिवाजी पाटील व तानाजी पाटील हे मतदारांसमोर विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडण्यात यशस्वी झाले. त्यामुळे त्यांनी सहा जागांवर वर्चस्व मिळवत ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन केली.
---
गावात रखडलेले सिमेंट रस्ते, भुयारी गटार, बोधले महाराज मंदिर परिसर सुशोभिकरण वीज, पाणी, स्वच्छता या कामावर जास्त भर देणार आहे.
- किसन पाटील
सरपंचपदाचे दावेदार