सोलापूर : सोलापूरचे चार हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, श्रीकिसन सारडा आणि अब्दुल रसूल कुर्बान हुसेन यांना १२ जानेवारी १९३१ रोजी तत्कालीन ब्रिटिश सरकारने क्रूर अशा मार्शल लॉ च्या आधारे फाशीची शिक्षा दिली होती. या सोलापूरच्या हुतात्मा, निरपराध, स्वातंत्र्यसैनिकांवर पोस्टाच्या तिकिटाचे प्रसिध्दीकरण होत आहे. १२ जानेवारी रोजी हे तिकीट प्रसिद्ध होत असल्याची माहिती परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्थेच्या सचिवा अमृता अकलूजकर यांनी दिली.
यासाठी काही वर्षांपासून खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, परिवर्तन समूह बहुउद्देशीय संस्था आणि सोलापूर सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्रयत्न झाले होते. परिवर्तन समूह संस्थेने २०२०मधे संचार मंत्रालयाकडे हा पाठपुरावा केला होता. पोस्टाचे तिकीट प्रसिद्ध व्हावे, याकरिता लागणारे सर्व सरकारी पुरावे आणि चारही हुतात्म्यांची माहिती संचार मंत्रालयाच्या अटीसहीत संचार मंत्रालयाकडे पुरविली. महानगरपालिका आयुक्त शिवशंकर, नगर सचिव दंतकाळे, शिवशंकर धनशेट्टी, डॉ. सतीश वळसंगकर, प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, रवींद्र मणियार, दत्तात्रय जक्कल, अनिल भुदत्त, हर्षवर्धन देवरेड्डी, वैभवकुमार आलदर यांनी पुरावे गोळा करून देण्यासाठी पाठपुरावा केला.
केंद्रीय संचारमंत्री रवी शंकर प्रसाद व केंद्रीय संचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या अर्जास मान्यता दिली.
तसेच संजय धोत्रे यांनी तिकीट वितरित करण्यासाठी लागणारे पाच लाख रुपयांचे मूल्य सोलापूरच्या अस्मितेचा विचार करून आणि ९० वर्षांनंतर स्वातंत्र्यवीरांना श्रद्धांजली म्हणून माफ केले. सर्व सोलापूरकरांना ज्याचा सार्थ अभिमान वाटावा, अशी घटना आज ९० वर्षांनंतर पूर्ण होत आहे.