विलास जळकोटकर सोलापूर: पुणे-हैैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील अपघात, कर्नाटकची सीमा लागून असल्याने त्या भागातून येणारे रुग्ण, १२ लाख लोकसंख्येच्या सोलापूर शहरातील घटना यामध्ये अनेकदा माणसे जखमी होतात. काही दगावतातही. वर्षाकाठी अशा प्रकरणांमधून येथील सिव्हिलमध्ये अर्थात शासकीय रुग्णालयात सरासरी २५०० जणांचे पोस्टमार्टेम (शवविच्छेदन) होत असतात. आजअखेर या केंद्राकडे १ हजार २६३ जणांची शवचिकित्सा झाली आहे.
येथील शासकीय रुग्णालयामध्ये सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, विजयपूर (कर्नाटक) येथून रुग्ण येतात. जिल्ह्याच्या परिसरातील उस्मानाबाद-सोलापूर, विजयपूर-सोलापूर मार्गावर रहदारी वाढली आहे. यातून अपघातांची संख्याही वाढते आहे. हा सर्व ताण येथे पडतो. शहरात एकमेव असलेल्या शवविच्छेदन केंद्रात ही शवचिकित्सा केली जाते.
सोलापूर शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेने येथे महापालिकेकडून आणि शल्यचिकित्सा विभागाकडून आणखी किमान दोन शवविच्छेदन केंद्रांची उभारणी व्हायला पाहिजे. यामुळे सोलापूरच्या एकमेव शवविच्छेदन केंद्रात होणारी २ हजार ५०० शवचिकित्सांची विभागणी होऊन काम सुलभ होण्यास मदत होणार आहे, अशी अपेक्षा न्यायवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. सतीन मेश्राम यांनी व्यक्त केली.
जिल्ह्यातून विविध कारणांवरून दगावल्यांचे पोस्टमार्टेम सबंधित नजीकच्या रुग्णालयात होणे बंधनकारक आहे. रुग्णसेवा अत्यावश्यक बाब असल्याने प्रशासन ही बाब नाकारत नाही, मात्र उपचाराची सोय असल्यास असे प्रकार होऊ नये, असे अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे म्हणाले.
आणखी दोन पोस्टमार्टेम केंद्र हवे- सोलापूर महापालिकेच्या वतीने पोस्टमार्टेम केंद्रासाठी अन्यत्र जागा उपलब्ध करून त्याची उभारणी करावी. रुग्णांच्या नातलगांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने ठिकाण निवडायला हवे, अशाही भावना डॉक्टरांनी व्यक्त केल्या. शल्यचिकित्सा विभागाकडूनही यासाठी पाठपुरावा करण्याची मागणी होऊ लागली आहे.
सात दिवसात मिळेल पोस्टमार्टेम रिपोर्ट- अपघात, मारामारी प्रकरणातून मृत्यू पावलेल्या व्यक्ती पोस्टमार्टेम रिपोर्टसाठी वारसदार चकरा मारतात. यावर या विभागाकडून आठ ते दहा दिवसात अहवाल मिळण्याची सोय करण्यात आली आहे. मात्र संबंधित अहवाल पोलीस ठाण्याला अर्ज करून तो प्राप्त करता येईल, असा खुलासा डॉ. सतीन मेश्राम यांनी केला.
शीतगृहात ४० मृतदेह ठेवण्याची सोय- शासकीय रुग्णालयाच्या न्यायवैद्यक विभागात नुकतीच शीतगृहाची सोय झाली आहे. आवश्यकतेनुसार येथे एकाचवेळी ४० मृतदेह ठेवण्याची सुविधा आहे. बेवारस मृतदेहाच्या वारसदाराचा शोध घेण्यासाठी तो राखीव ठेवला जातो. एखाद्यावेळी परगावाहून येणाºया मृतदेहाचे नातलग येण्यास विलंब होत असेल तर त्यांना नियमानुसार फी भरून ते राखाीव ठेवता येणे आता शक्य झाले आहे.