सोलापूर : म्युकरमायकोसिसमुळे रुग्णाच्या जबड्याला इजा झाल्यास तो काढावा लागतो. त्यामुळे पुढे अन्न खाताना अडचणी येतात. या अडचणी दूर करण्यासाठी वरच्या जबड्यात पायातील हाड काढून बसवता येत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्येही म्युकरमायकोसिस आजार होत होतो. त्यावेळी या आजाराची तीव्रता आजच्या एवढी नव्हती. त्यामुळे हा आजार समोर आला नाही. दुसऱ्या लाटेमध्ये या आजाराचे अधिक रुग्ण समोर येत आहेत. या आजारामुळे जबड्याचे हाड खराब झाल्यास, वरच्या जबड्यात पायाच्या कडेचे एक हाड काढून बसवता येते. रक्तवाहिन्यांसोबत वरच्या जबड्यात फिक्स करता येते. जबड्याच्या हाडाऐवजी गालाच्या उंचवट्यावर (झॅगोमा इम्प्लांट्स) दात बसविता येतात. तिथे जबड्याचे हाड नसले, तरी त्या हाडाचा वापर केला जातो.
म्युकरमायकोसिसच्या उपचारानंतर हाडाची स्थिती चांगली असेल, तर दात पुन्हा (इ्न्प्लांट) बसवता येतात. या आजारावर उपचार झाल्यानंतर, साधारणपणे पाच ते सहा महिन्यांनंतर दात पुन्हा बसविता येतात. लगेच दात बसविल्यास ते जास्त दिवस टिकू शकत नाही. त्यासाठी जबड्यामध्ये चांगल्या स्थितीत हाड असावे लागते.
काही दिवस खावे मऊ पदार्थ
एका बाजूला दात उरले असतील, तर तिथून खाता येते. म्युकरमायकोसिस झाल्यास काही दिवस मऊच खावे लागते. खाण्यासाठी फक्त खालचे दात असून उपयोग नाही, तर दोन्हीकडचे दात असायला हवेत. अन्न खाण्यासाठी दात नसल्यास कवळी बसविणे हाही चांगला पर्याय आहे. म्युकरमायकोसिसच्या उपचारानंतर पहिल्या महिन्यात तात्पुरती कवळी बसवता येते. ती जबड्यात व्यवस्थित बसली की नाही, हे तपासून त्यात काही दुरुस्ती करता येते. कवळीत रुग्णाच्या जबड्याप्रमाणे बदल करून तीन ते सहा महिन्यांत कवळी बसवता येते.
जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करत असताना, रुग्णाला पुन्हा दात बसवायचे असल्याने, त्याचा विचार तेव्हाच करायला हवा. त्यामुळे शस्त्रक्रिया करताना दात बसवता येतील, अशी व्यवस्था करावी लागते. प्रगत तंत्रज्ञानामुळे रुग्णांवर चांगले उपचार करता येतात.
डॉ.कौस्तुभ तांबेकर, मुखदंत शल्यकर्म चिकित्सक