सोलापूर : महापालिका स्थायी व परिवहन समिती सदस्यांच्या फेब्रुवारी महिन्यात झालेल्या नियुक्त्या नगरविकास खात्याने सोमवारी बेकायदेशीर ठरविल्या. त्यामुळे पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी स्थायी व परिवहन समिती सभापती निवड सोमवारी स्थगित केली.
स्थायी व परिवहन सदस्य निवडीवरुन एमआयएम सदस्यांमध्ये वाद निर्माण झाला आहे. समितीच्या सदस्य पूनम बनसोडे यांनी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार केली होती. त्यामुळे नगरविकास खात्याने 5 मार्च रोजी निवडणुकीला स्थगिती दिली होती. याविरुद्ध भाजपच्या अंबिका पाटील उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने तत्काळ निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. परंतु या दरम्यान नगर विकास खात्याने पूनम बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीसंदर्भात विभागीय आयुक्तांकडून अहवाल मागवला होता.
विभागीय आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सदस्य निवडी नियमांना धरून झालेल्या नाहीत असा अहवाल नगरविकास खात्याला पाठवला. त्यानुसार नगर विकास खात्याने सदस्य निवडीचा ठराव विखंडनास पात्र असल्याचा आदेश काढला. याबाबतचे पत्र महापालिका प्रशासनाला पाठवले. हे पत्र तत्काळ पीठासन अधिकाऱ्यांकडे पोहोचले. या पत्राच्या आधारे जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक स्थगित केली. भाजपाच्या सदस्यांनी पुन्हा जल्लोषाची तयारी केली होती. परंतु नगर विकास खात्याच्या आदेशामुळे पुन्हा त्यांचा हिरमोड झाला.