सोलापूर - सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महायात्रेत आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घालण्यात आलेली बंधने पाळीत पारंपारिक अक्षता सोहळा पार पडला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे याच बरोबर सिद्धेश्वर यात्रा पंच कमिटीचे सदस्य आणि आणि मानकरी यावेळी उपस्थित होते. आज नंदीध्वज संमती कट्ट्यावर आणले गेले नाहीत. सिद्धरामेश्वर यांच्या योगदंडाशी कुंभार कन्येचा विवाह सोहळा पार पडला.
ना हलग्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला, ना नंदीध्वजांची मिरवणूक दिसली.. कोरोना नियमांमुळे यंदाचा अक्षता सोहळा साध्या पध्दतीने पार पडला. दरम्यान, कोरोनाच्या निर्बंधामुळे पारंपरिकता दृष्टीस न पडल्याने सोलापूरकर काहीसे भावनिक झाले खरे; मात्र आपल्या घराजवळून सोहळा मार्गस्थ होताना भाविकांनी ‘हर्र बोला हर्र..सिध्देश्वर महाराज की जय!’ असा जयघोष करीत दर्शन घेतलेे. बग्गीतून योगदंड अन् रथासारखे सजविलेल्या वाहनातून पालखी नेत प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांनी अक्षता सोहळ्यासाठी हजेरी लावली होती.