लोकमत न्यूज नेटवर्क
बार्शी ; बार्शी तालुक्यातील आगळगाव येथे बीएसएनएलसह विविध कंपन्यांच्या टॉवरची वीज गेल्यानंतर मोबाईलची रेंज गायब होण्याच्या प्रकारात वाढ
झाली आहे. इंटरनेटला फोर जी स्पीड असून नेटला टुजी सुद्धा मिळत नाही. त्यामुळे या परिसरात सीमकार्ड धारकांची असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.
उत्तर बार्शी तालुक्यात आगळगाव हे ७ ते ८ हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव आहे. सध्या कोरोनामुळे शालेय मुलामुलींचा ऑनलाईन अभ्यासक्रमाकडे जास्त कल असल्याने केवळ सतत लाईट गेल्यामुळे रेंजअभावी अभ्यासाचे मोठे नुकसान होत आहे.
आगळगाव हे आठवडी बाजाराचे गाव असून गावात बँका, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने गावच्या परिसरात बाहेरगावच्या लोकांची सतत रहदारी असते. मोबाईल रेंज गेल्यानंतर नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या टाॅवर असलेल्या कार्यालयात जनरेटर असतानासुद्धा तो चालू केला जात नसल्याची ओरड होत आहे.