अनेक गावांतील शेतीपंपाचा वीज पुरवठा पूर्णपणे बंद केल्याने नागरिक व जनावरांचे हाल सुरु झाले. काही शेतकरी पैसे भरण्यास तयार असले तरी पैसे भरण्याची तयारी नसलेल्यांना वीज मंडळानेच चाप लावण्याची गरज आहे, विनाकारण आम्हाला का त्रास देताय, अशा तक्रारी बिल भरणारे करू लागले आहेत.
तालुक्यात घरगुती, औद्योगिक व शेतीपंपाची थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. ग्राहकांना सूचना देऊनही स्वत:हून कोणी पैसे भरण्यासाठी पुढे येत नाहीत. त्यामुळे वीज मंडळाने शेतीपंपाचा वीजपुरवठाच बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत शेतकरी व ग्राहकांना सूचना देऊनही पैसे न भरणाऱ्या शेतकऱ्यांचा काही गावात वीजपुरवठा पूर्ण बंद केला तर काही गावात एक तास सुरू ठेवला आहे.
बहुतांश शेतकरी वीज बिल भरण्यासाठी तयार आहेत व काहींनी वीज बिल भरले आहे. मात्र अनेक शेतकरी काही रक्कम भरण्यास तयार नाहीत. आता पैसे भरण्यासाठी पुढे न येणाऱ्या शेतकऱ्यांवर वीज मंडळानेच कारवाई करण्याची गरज आहे.
पडसाळी ग्रामस्थांचा पुढाकार
पडसाळी येथील शेतकऱ्यांनी पुढाकार घेत वीज थकबाकी बिलापोटी साडेआठ लाख रुपये तर नवीन ३० वीज कनेक्शनसाठी प्रत्येकी १४ हजार प्रमाणे पैसे भरले आहेत. त्यांचा आदर्श घेऊन अन्य गावांनी वीज बिल भरावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.