कुर्डुवाडी महावितरण उपविभागातील ३८ गावांतून महावितरण कंपनीने थकीत वीजबिलाची केलेली वसुली ही जिल्ह्यात लक्षणीय ठरली. त्यावेळी ज्या ग्राहकांनी दिलेले टप्पे किंवा किमान थकबाकी भरली नाही, त्यांचे डीपीदेखील बंद करण्यात आले होते. त्यावेळी महावितरणला सहकार्य म्हणून कुर्डुवाडी, लऊळ, ढवळस, म्हैसगाव, कुर्डू, शिराळ, अंबाड, पडसाळी, अकुलगाव, बारलोणी, रोपळे, भूताष्टे परिसरातील शेतकऱ्यांनी किमान तीन किंवा पाच हजार रुपये कनेक्शननुसार महावितरणच्या पथकाकडे जमा केले. त्यामुळे थकबाकी वसुलीत आघाडी घेतलेल्या या विभागाची जिल्ह्यात चर्चा झाली. परंतु, महावितरण कंपनी वीजपुरवठ्यात मागे पडल्याची खंत शेतकऱ्यांतून व्यक्त झाली आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. पिण्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न या परिसराला भेडसावत असताना कमी प्रमाणात वीजपुरवठा होत आहे. आता कमी दाबाने वीजपुरवठा सुरू झाला आहे.
महावितरणने वीजप्रवाह उच्च दाबाने सुरू करावा, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. दोन-दोन दिवस वीज न येणे, आली तर कमी दाब असणे, त्यामुळे विद्युत मोटारी यावर चालत नाहीत. ग्राहक या त्रासाला कंटाळले आहेत.
----
१४८ कोटींची थकबाकी वसूल
कुर्डुवाडी उपविभागांतर्गत व्यवसायिक, औद्योगिक, घरगुती, शेतीसह प्रकारात मार्चएन्डपर्यंत १४८ कोटींची थकबाकी ग्राहकांकडे होती. टप्पे टप्पे देऊन महावितरणच्या पथकाने ही थकबाकी वसूल केली. त्यानंतरच खंडित वीजपुरवठ्याचे डीपी जोडण्यात आले. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांची वीज त्यांनी तोडली होती.
.................
सध्या वीजपुरवठा खंडित होतोय ही बाब सत्य आहे. परंतु, याला महावितरणचे कार्यालय जबाबदार नाही. कारण वीजपुरवठा करणाऱ्या कंपनीकडून गेल्या काही दिवसांत तांत्रिक कारणामुळे योग्य तो वीजपुरवठा झाला नाही. गुरुवारपासून वीजपुरवठा व्यवस्थित होईल.
- उल्हास कानगुडे,सहायक अभियंता, महावितरण उपविभाग कुर्डुवाडी