आदिनाथ कारखाना आ. रोहित पवारांच्या बारामती अॅग्रोने भाडेतत्त्वावर २५ वर्षे चालविण्यासाठी घेतल्याचे येथे समजताच तालुक्यातील चिखलठाण, कंदर, वांगी, केडगाव, टाकळी, कोंढारचिंचोली, केत्तूर, खातगाव येथील ऊस उत्पादकांनी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष साजरा केला. आता आमच्या उसाला चांगला भाव मिळेल, अशी भावना सभासदांमधून व्यक्त होऊ लागली आहे. उजनी धरणाच्या हाकेच्या अंतरावर असलेला आदिनाथ कारखान्याच्या १५ किलोमीटर परिसरात लाखो मे. टन उसाची उपलब्धता आहे. असे असताना आदिनाथ कारखाना आर्थिक संकटात सापडला यास स्थानिक नेतृत्व जबाबदार असल्याची भावना कारखान्याच्या ऊस उत्पादकासह सभासदांतून व्यक्त होत आहे.
करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातून बारामती अॅग्रो व अंबालिका या दोन पवारांच्या साखर कारखान्यास लाखो मे. टन ऊस गाळपासाठी जातो. त्या शेतकऱ्यांना इतर कारखान्यांपेक्षा १०० ते १५० रुपये जास्त भाव मिळतो, असा अनुभव आहे. आदिनाथची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना निश्चित जास्त भाव मिळेल, या आशेने ऊस उत्पादकांतून आनंद व्यक्त केला जात आहे. मात्र, कारखान्यावर राजकारण करणाऱ्या नेत्यांची मात्र निराशा झाली आहे. करमाळा तालुक्याच्या राजकारणात पूर्वीपासून जगताप, बागल, पाटील व नव्याने संजयमामा असे गट कार्यरत असताना आता आदिनाथ चालविण्यास घेतल्याने पवार गटाची पाॅवर वाढणार असल्याचे बोलले जात आहे.
कोट :::::::::
कारखान्याच्या १५ कि.मी. परिसरात पाच लाख मे. टन ऊस उपलब्ध असताना कारखान्याचा कारभार पारदर्शी व काटकसरीतून झाला नाही. परिणामी कारखाना आर्थिक संकटात सापडला. यास स्थानिक नेतृत्व जबाबदार आहे. आता अनुभव संपन्न असलेल्या पवारांनी आदिनाथ चालविण्यास घेतल्याने ऊस उत्पादकांना चांगला भाव मिळेल.
- धुळाभाऊ कोकरे,
ऊस उत्पादक, कुगाव
कोट :::::::::::
आदिनाथच्या परिसरात लाखो टन ऊस उपलब्ध असल्याने वाहतूक, उत्पादन खर्च कमी असताना कारखान्यातील कारभाऱ्यांनी हित न पाहिल्याने कारखान्यावर कर्जाचा बोजा कायम राहिला. त्यामुळे ऊस उत्पादकांना समाधानकारक भाव मिळू शकला नाही. कामगारांच्या पगारी थकल्या व चांगला कारखाना तोट्यात आला. बारामती अॅग्रो चालविण्याचा अनुभव असलेल्या पवारांकडून ऊस उत्पादक व कामगारांना नक्कीच न्याय मिळेल.
- बापूराव देशमुख,
ऊस उत्पादक, वांगी
कोट :::::::::::::::
आदिनाथ व मकाई हे दोन्ही कारखाने सभासदांनी विश्वासाने बागल गटाच्या ताब्यात दिले, पण कारखाने आर्थिक डबघाईला आले. पवारांचे बारामती अॅग्रो कारखाना इतरांपेक्षा १०० ते १५० रुपये जास्तीचा दर मिळेल. पवारांनी आदिनाथ चालविण्यास घेतल्याने ऊस उत्पादकांना फायदाच होणार आहे.
- आप्पासाहेब झांजुर्णे,
ऊस उत्पादक, रामवाडी.