सोलापूर : महावितरणच्या बारामती परिमंडलमध्ये उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे (एचव्हीडीएस) कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत ४७७३ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याच्या यंत्रणेची उभारणी पूर्ण झाली आहे. त्यापैकी ३९०९ कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.
उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) द्वारे शाश्वत व सुरळीत वीजपुरवठा होणार आहे. उच्चदाब वाहिनी उपकेंद्रातून सर्किट ब्रेकरद्वारे नियंत्रित होत असल्याने वीज अपघाताचा धोका नाही. उच्चदाब वाहिन्यांवरील वीजप्रवाह कमी झाल्यामुळे आकडे टाकून वीजचोरी करता येणार नाही व वीजवाहिनीमध्ये घट होईल. एचव्हीडीएसमधून प्रत्येक रोहित्रावर एक किंवा दोन कृषिपंपांचा वीजपुरवठा असल्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण नगण्य होईल. कृषिपंपधारकांनी विद्युत भाराच्या मागणीनुसार रोहित्रांची क्षमता ठरविण्यात येत आहे.
या प्रणालीमध्ये १० केव्हीए, १६ केव्हीए व २५ केव्हीए क्षमतेचे रोहित्र वापरण्यात येत आहेत. उच्चदाब वाहिनी ही ग्राहकांच्या विहिरीपर्यंत उभारण्यात येत असल्याने लघुदाब वाहिनीविरहित वीजजोडणी राहणार आहे. त्यामुळे कृषिपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा होणार आहे व रोहित्र नादुरुस्त होण्याचे प्रमाणसुद्धा अतिशय नगण्य राहणार आहे.
प्रचलित पद्धतीनुसार कृषिपंपांना ६३ केव्हीए /१०० केव्हीए क्षमतेच्या वितरण रोहित्राद्वारे लघुदाब वाहिनीद्वारे वीजपुरवठा करण्यात येतो. एका रोहित्रावर जवळपास १५ ते २० कृषिपंपांना वीजपुरवठा केला जातो. लघुदाब वाहिनीची लांबी अधिक असल्याने वीजचोरी होणे, कमी दाबाने वीजपुरवठा होणे, रोहित्र अतिभारित होऊन नादुरुस्त होणे, तांत्रिक हानी वाढणे, रोहित्र वारंवार बिघडणे व वीजपुरवठा खंडित होणे आदी समस्यांवर एचव्हीडीएस प्रणालीद्वारे मात करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कृषिपंपांना सुरळीत व शाश्वत वीजपुरवठा करण्यासाठी नवीन वीजजोडण्या एचव्हीडीएस प्रणालीद्वारे देण्यात येणार आहेत.
८४३८ जणांना मिळणार नव्याने जोडणी- एचव्हीडीएसद्वारे सोलापूर व सातारा जिल्हा तसेच बारामती मंडलमध्ये स्वतंत्र रोहित्रांसह नवीन वीज यंत्रणा उभारून सद्यस्थितीत १२३७२ कृषिपंपांना नवीन वीजजोडणी देण्याचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात ३५०२, सोलापूर जिल्ह्यात ३९०९ आणि बारामती मंडलमधील ३२०८ अशा एकूण १० हजार ६१९ कृषिपंपांची नवीन वीजजोडणी एचव्हीडीएसद्वारे कार्यान्वित करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर शहर व ग्रामीण, अकलूज, पंढरपूर, बार्शी या पाच विभागांतर्गत मार्च २०१८ अखेर पैसे भरून प्रलंबित असणाºया ८४३८ कृषिपंपांना एचव्हीडीएसद्वारे नवीन वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत ४७७३ रोहित्रांसह वीजयंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे तर ३९०९ कृषिपंपांची वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.
शेतकºयांना देण्यात येणारा वीजपुरवठा सुरळीत व विनाअडथळा देण्यासाठी उच्चदाब वितरण प्रणालीच्या माध्यमातून नव्याने वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे़ लवकरच सोलापूर जिल्ह्यातील शेतकºयांना नव्याने वीजजोडणी देण्याचे काम सुरू आहे़ लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यासाठी महावितरण प्रशासन सज्ज आहे़ - ज्ञानदेव पडळकर,अधीक्षक अभियंता, महावितरण