भोसे येथील उपकेंद्रात ५ एमव्हीएचा ट्रान्स्फॉर्मर आहे; परंतु २३ मे रोजी येथील ५ एमव्हीएचा ट्रान्स्फाॅर्मरमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे या उपकेंद्रावर अवलंबून असलेल्या शेती, गृह आणि व्यावसायिक वीजपुरवठ्याचा भार एका ट्रान्स्फाॅर्मवर आला आहे. त्यामुळे मागील सात दिवसांपासून वीजपुरवठ्यात निम्म्याने कपात करून चार तास वीजपुरवठा केला जात आहे.
सध्या उन्हाळा अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे उन्हाची तीव्रता खूपच वाढली असल्याने शेतीपिकांना पाण्याची नितांत गरज असते. अशाप्रसंगी वीजपुरवठा ८ तासांवरून चार तासांवर आल्याने शेती पिकांना पाण्याची कमतरता भासू लागली आहे. पिके धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून याचा गांभीर्याने विचार करून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी शेतकाऱ्यांमधून होऊ लागली आहे.
भोसे उपकेंद्रातील ट्रान्स्फाॅर्मर नादुरुस्त झाल्यामुळे शेती पिके तर धोक्यात येऊ लागली आहेतच, शिवाय भगीरथ योजनेच्या वीजपुरवठ्यात कपात केली आहे. परिणामी, सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे शहरी भागातील नागरिकांना बाहेर जावे, तर पोलीस कारवाई आणि घरात बसावे, तर असह्य उकाडा सहन करावा लागतो. यामुळे नागरिक दुहेरी संकटात सापडले आहेत.
कोट
भोसे उपकेंद्रातील नादुरुस्त ट्रान्सफाॅर्मर त्वरित दुरुस्ती करावा. यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनराव शिंदे यांच्यासह वीज वितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा सुरू आहे.
-ॲड. गणेश पाटील,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस
कोट
भोसे येथील ट्रान्स्फाॅर्मर बदलून घेण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. साधारण १० दिवसांत नवीन बसविण्याची कार्यवाही होईल.
-हेमंत कासार, उपअभियंता,
वीज वितरण कंपनी