श्रीपूर : श्रीपूर (ता. माळशिरस) येथील प्राची विवेक पन्हाळे हिने एमडीएस परीक्षेत उज्ज्वल यश मिळवत राष्ट्रीय पातळीवर २२ व्या रॅंकने उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला आहे. या यशाबद्दल जागृती तरुण मंडळातर्फे तिचा आई-वडिलांसमवेत सत्कार करण्यात आला.
यावेळी मंडळाचे प्रा. नितीन देशपांडे, प्रवीण कुलकर्णी, प्रवीण शिंदे, सचिन नागणे, गणेश गुडे, श्रीकृष्ण पुजारी, दादा पवार आदी उपस्थित होते. प्राची पन्हाळे हिचे शालेय शिक्षण श्री चंद्रशेखर विद्यालयात झाले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, कऱ्हाड येथे, बीडीएस तिने मुंबई येथील गव्हर्नमेंट डेन्टल कॉलेजमध्ये पूर्ण केले. एमडीएस या पात्रता परीक्षेसाठी देशभरातून सुमारे ७६ हजार परीक्षार्थी बसले होते. त्यात प्राची पन्हाळे हिने २२ वा क्रमांक मिळवला.
नियमित अभ्यासामुळेच यश
शालेय जीवनापासून नियमित अभ्यास करण्याची सवय, त्यातच आई, वडील, भाऊ यांची साथ व प्रेरणा या आधारावर मी अभ्यासात उत्तरोत्तर प्रगती करु शकले. आपल्यासमोर ध्येय ठेवून वाटचाल केली तर हमखास यश मिळते, असे प्राची पन्हाळे हिने सांगितले.