सोलापूर : वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या राज्यातील सर्व २८८ जागा लढविणार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी सांगितले.भाजपला बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अशावेळी तिसरी आघाडी सत्तेत यावी यासाठी आम्ही प्रयत्न करु. राहुल गांधी की मायावती? असा मुद्दा आला तर आम्ही मायावतींना पाठिंबा देऊ. शरद पवारांचा विषय आलाच तर त्यांना विरोध करु,असेही आंबेडकर यांनी सांगितले.दुष्काळी दौऱ्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही राजकीय विचारांची लढाई आहे. मोदींनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणून ठेवली आहे. निवडणुकीचा तिसरा आणि चौथा टप्पा संपल्यानंतर त्यांना बिकट परिस्थितीचा अंदाज आला आहे. लोकसभा निवडणुकीत सध्या गृहित धरण्यात येणारे सगळे अंदाज चुकून धक्कादायक निकाल लागतील. ही लढाई आपल्या हातून गेल्याचा अंदाज आल्यामुळे ते वैयक्तिक टीका करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक लढविताना आम्ही विधानसभेचा निर्णय पक्का केला होता. विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही. वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढविणार आहे.आंबेडकर म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा तालुक्यात भीषण दुष्काळ आहे. लोकसभा निवडणुकीच्या नादात भाजप आणि शिवसेनेने दुष्काळग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले आहे. दुष्काळासंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन देण्यासाठी ११ मे रोजी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.
विधानसभेच्या २८८ जागा लढविणार-प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2019 6:24 AM