सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोल्यासह सोलापुरातूनही निवडणूक लढणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसने अपप्रचार करणे बंद करावा. आंबेडकरांच्या प्रचारासाठी मी पुढील ३० दिवस सोलापूर मुक्कामी आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
सुजात आंबेडकर म्हणाले, सोलापुरातील कार्यकर्त्यांनी बाळासाहेबांना विनंती केली होती. ही विनंती त्यांनी मान्य केली आहे. मागील खेपेला सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातून निवडणूक लढविली होती. एवढं चांगलं नेटवर्क असूनही शिंदे यांचा पराभव झाला. त्यांच्याविरोधातील नाराजी अद्यापही कायम आहे.
सोलापूरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो येथील पाण्याचा. येथील उद्योग, शिक्षण, गायरान जमिनींचे प्रश्न कायम आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे वंचित बहुजन समाजाचे प्रतिनिधीत्व करतात ही सर्वात मोठी अफवा आहे. त्यांनी वंचित समाजाला केवळ लॉलीपॉप देण्याचे काम केले. बहुजन समाज आणि अल्पसंख्याक समाजाला एक हक्काचा मतदार बनवून ठेवले. केवळ निवडणुका आल्या की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते बहुजन समाजातील नेत्यांच्या घरी जातात. लोक आता त्यांच्यावर चिडलेले आहेत. म्हणून तर २०१४ साली लोकांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला नाकारले.
भाजपाप्रमाणे काँग्रेसही फेक न्यूज पसरविते - प्रकाश आंबेडकर सोलापुरातून लढणार नसल्याचे वृत्त काही दिवसांपूर्वी चर्चेत आले. याबद्दल विचारले असता सुजात आंबेडकर म्हणाले, काँग्रेसवाले या सर्व अफवा पसरवित आहेत. २०१९ च्या फेब्रुवारीपासून काँग्रेस एकाबाबतीत भाजपला फॉलो करीत आहेत ते म्हणजे फेक न्यूज. अबकी बार सोलापूर का खासदार, बाबासाहेब का वारसदार, हा नारा घेऊन आम्ही लोकांना भेटत आहोत. लक्ष्मण माने यांनी सातारा येथील सभेत जाहीर केले होते की प्रकाश आंबेडकर हे सोलापूर लोकसभा लढविणार आहेत. त्याला एक महिना झाला. पण अनेक लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही. खरं तेव्हाच ही गोष्ट सर्वांनी गांभीर्याने घ्यायला हवी होती. अजून पुरावा आणि माहिती द्यायची गरज नाही.